breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील महाविद्यालये, विद्यापीठे आजपासून सुरू; विद्यार्थ्यांना लसीचे दोन डोस बंधनकारक

पुणे – कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पुणे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे आजपासून सुरू होत आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर जे विद्यार्थी पुण्याबाहेरून येणार आहेत, त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखविणे आवश्यक आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.

ऑनलाईन शिक्षणातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, प्रात्यक्षिके आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने महाविद्यालये सुरू करण्याची मागणी संस्थाचालक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. शिवाय राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले. परंतु महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊनही महाविद्यालये बंद असा विरोधाभास निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिल्याचे जाहीर केले.

दरम्यान, अजित पवार यांनी पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पुण्यातील नाट्यगृह, पर्यटन स्थळे आणि विद्यापीठे सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यात आजपासून महाविद्यालयांसह पर्यटन स्थळेही सुरू होणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button