मुंबई, पुणेकरांची थंडीत पावसाळी पहाट
मुंबई – हवामान विभागाने बुधवारी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसात पाऊस पडल्याने नागरिकांना नेमके काय करावे हे सुचत नाही आहे. आज डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी पावसात ऑफिसला निघालेल्यांची तारांबळ उडाल्याची दिसून आले.
हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि मालदीव, लक्षद्वीपच्या परिसरात चक्रीवादळामुळे पाऊस पडत आहे. त्यामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अशा स्थितीत पुढील २४ तास महाराष्ट्रातील सागरी भागात पावसाची शक्यता आहे. कोकणातही पावसाची शक्यता आहे. पावसाच्या शक्यतेमुळे मच्छीमारांनी पुढील ५ दिवस महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रात मासेमारीला जाऊ नये, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय समुद्रात ताशी पाच ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या कारणास्तव हा इशारा देण्यात आला आहे.