breaking-newsमहाराष्ट्रराजकारण

नगर रुग्णालय दुर्घटना: ‘राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत’ म्हणत शिवसेनेनेच केला PM Cares मधील व्हेंटिलेटर्समुळे आग लागल्याचा उल्लेख

नगर |

नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात शनिवारी सकाळी आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला. नगरमधील आगीच्या दुर्घटनेची नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या समितीमार्फत चौकशी केली जाणार आहे. या समितीला ७ दिवसांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. असे असतानाच आता शिवसेनेने या मुद्द्यावरुन आरोग्य व्यवस्थेची होरपळ होत असल्याचं म्हणत सरकारने केवळ आश्रू ढाळू नये, असा टोला लगावला आहे. अहमदनगरच्या रुग्णालायमध्ये आग लागलेल्या ठिकाणी पीएम केअर्सअंतर्गत देण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर्स असल्याचा मुद्दाही शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आलाय.

  • असे वर्षानुवर्षे चालले आहे

“राज्यात दिवाळी साजरी होत असतानाच नगरच्या दुर्घटनेने आनंद होरपळून खाक झाला आहे. नगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास शनिवारी आग लागली. त्यात ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू व्हावा हे धक्कादायक आहे. अतिदक्षता विभागात रुग्णांना प्राण वाचविण्यासाठी आणले जाते, पण गेल्या दोनेक वर्षांत राज्यातील रुग्णालयांत अनेक ठिकाणी अग्नितांडव भडकले. या आगीची ठिणगी बहुतेक वेळा अतिदक्षता विभागातच पडली असल्याचे दिसत आहे. आतादेखील नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागासच आग लागली आणि त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. गोंदिया, नाशिक, मीरा-भाईंदर, वसईसारख्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांत इस्पितळांना आगी लागल्या. त्यात अनेक कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. अशा आगी लागून प्राणहानी झाली की, लोकांच्या संतापाचा तेवढ्यापुरता उद्रेक होतो. विरोधी पक्षाचे लोक राजकीय थयथयाट करतात. सरकार चौकशीचे आणि कठोर कारवाईचे आदेश देते. अश्रू ढाळून मृतांच्या नातेवाईकांना दोन-पाच लाखांची मदत करते, पण अशा दुर्घटनांचा सिलसिला कायम राहतो. इस्पितळांना आगी लागायच्या काही थांबत नाहीत. फक्त आगीची कारणे शोधायची व मागच्या आगीचे पान पुढे ढकलायचे असे वर्षानुवर्षे चालले आहे,” असं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

  • आग का भडकली याची विविध कारणे

“नगरची आग म्हणे शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे. अतिदक्षता कक्षाचे फायर ऑडिट करण्यात आले होते अशी माहिती नगरचे जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली आहे. तरीही रुग्णांचा मृत्यू हा गुदमरून झाला की होरपळून झाला हे तपासून पाहू असे सांगण्यात आले. मृत्यू जळून झाला की गुदमरून, हे जरूर तपासा, पण मृत्यू इस्पितळास आग लागल्यामुळेच झाला व जनतेचे रक्षण, संरक्षण करणे हे कोणत्याही सरकारचेच कर्तव्य असते. या ठिकाणी आग का भडकली याची विविध कारणे आता समोर येत आहेत,” असा उल्लेख लेखात आहे.

  • व्हेंटिलेटर्स पीएम केअर्स फंडातून देण्यात आले होते

तसेच या लेखामध्ये शिवसेनेने अहमदनगरच्या रुग्णालयात आग लागली तेथे पीएएम केअर्स फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सचाही उल्लेख केलाय. “अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर्स हे पीएम केअर्स फंडातून देण्यात आले होते. ते निकृष्ट दर्जाची होते व त्यामुळेच शॉर्टसर्किट झाले असावे असा संशय आमदार रोहित पवार यांना आहे. आग कशाने लागली व भडकली या संशोधनातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत,” असं लेखात म्हटलं आहे.

  • हे चित्र तथाकथित महासत्ता म्हणवून घेणाऱ्या देशाला शोभत नाही

“पंतप्रधान मोदी हे आध्यात्मिक गृहस्थ आहेत. देशात सुखशांती नांदावी आणि लोकांचे कल्याण व्हावे यासाठी ते सदैव ईश्वरचरणी प्रार्थना करीत असतात. नुकतेच ते रोमच्या व्हॅटिकन सिटीत जाऊन पोप फ्रान्सिस यांना भेटले व जगाच्या कल्याणासाठी आशीर्वाद घेतले. आता लगेच ते केदारनाथच्या गुहेत जाऊन ध्यानाला बसले. त्यांच्या ध्यानातून जी आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली, त्यातून देशावरील संकटे दूर होतील, लोकांचे कल्याण होईल असे वाटत असताना पाटण्यात विषारी दारूचे ३२ बळी गेले व नगरच्या आगीत ११ जण होरपळले गेले. ध्यानसूत्रात विघ्न आले की, दुर्घटना घडतात अशी एक अंधश्रद्धा आहे. देशाची आरोग्य यंत्रणा कशी पह्ल आणि गोलमाल आहे त्याचा पर्दाफाश कोरोना काळात झालाच आहे. आरोग्य व्यवस्थेवर सगळय़ात कमी खर्च करणारा विशाल देश असे आपल्या बाबतीत बोलले जाते. देशातील आरोग्य व्यवस्था भुसभुशीत पायावर उभी आहे. आजही दुर्गम भागात, खेडय़ापाडय़ांत इस्पितळे नाहीत, रुग्णवाहिका नाहीत. रुग्णांना पाठीवर उचलून पिंवा झोळीत बांधून न्यावे लागते. अनेकदा मृतदेहांची ससेहोलपट होताना दिसते. हे चित्र तथाकथित महासत्ता म्हणवून घेणाऱ्या देशाला शोभत नाही,” असं लेखात म्हटलं आहे.

  • … पण तोपर्यंत सगळाच खेळ संपून गेलेला असतो

“बिहार, ओडिशासारख्या राज्यात आरोग्य व्यवस्था कोसळून गेली आहे. महाराष्ट्रात नगर-गोंदियासारख्या दुर्घटनांमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात हेदेखील आहेच. एकतर धड उपचार मिळत नाहीत व अनेकदा उपचार सुरू असताना अपघात होतात व रुग्ण प्राण गमावतात. हे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात अनेक भागांत घडत आहे. भंडारा जिल्ह्यात सरकारी इस्पितळातील शिशू केअर विभागाला आग लागली. त्यात १० बालकांचा होरपळून मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी भांडुप येथील ड्रीम मॉलमधील कोविड हॉस्पिटलला आग लागली होती. त्यात ११ रुग्णांची राख झाली होती. नागपुरात, नाशिकमध्ये, वसईलादेखील रुग्ण होरपळून मेले. वसई-विरारच्या कोविड हॉस्पिटलातही अतिदक्षता विभागातच आग लागून त्यात १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. आग लागल्यावर ठणाणा करीत अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचतात, पण तोपर्यंत सगळाच खेळ संपून गेलेला असतो,” असं लेखात म्हटलंय.

  • ‘कोविड-१९’मुळे देशाला व राज्याला आरोग्यमंत्री आहेत हे निदान समजले तरी

“आज देशातीलच आरोग्य व्यवस्था अतिदक्षता विभागात बेजार होऊन पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्याजिल्ह्यांत डॉक्टरांची कमतरता आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिकामी आहेत. पंत्राटी पद्धतीने वैद्यकीय सेवा पुरवण्यावर भर आहे. त्या पंत्राटी अधिकाऱ्यांचे मानधनही शासनाने थकवले आहे. ज्या राज्यात डॉक्टर्स, शिक्षक संपावर जातात त्या राज्याची अवस्था बरी नाही असे सर्वसाधारणपणे मानायला हवे. अनेक सरकारी रुग्णालयांत एक्स-रेची व्यवस्था नाही. कान, नाक, घसा, भूलतज्ञ, डॉक्टर्स नाहीत. एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर चांगले रुग्णालय नाही. आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा खर्च जेमतेम दोन-तीन टक्क्यांच्या आसपास होतोय. ‘कोविड-१९’च्या महामारीमुळे देशाला व राज्याला आरोग्यमंत्री आहेत हे निदान समजले तरी, नाहीतर मंत्रिमंडळात गृह, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, ऊर्जा याउपर कोणतीच खाती नाहीत असेच चित्र पूर्वी होते. केंद्रातही रेल्वे, पेट्रोलियम, संरक्षण, गृह हीच महत्त्वाची खाती ठरतात व आरोग्य मंत्रालय दुय्यम ठरवले जाते,” असा उल्लेख लेखात आहे.

  • हे पुनः पुन्हा घडू नये यासाठी

“आरोग्य व्यवस्थेत सरकारला कालपर्यंत कोणताच रस नव्हता. आरोग्य व्यवस्थेचेही संपूर्ण खासगीकरण व्हावे या मताचे आपले सरकार आहे, पण ज्या देशाची बहुसंख्य जनता गरीब व दारिद्रय़रेषेखालील आहे, त्यांना ही भांडवली आरोग्य व्यवस्था परवडणार आहे काय? ग्रामीण आरोग्य व्यवस्था ही असून नसल्यासारखीच आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असेच ते चित्र आहे. त्यामुळे उपचारांशिवाय तडफडत मरणाऱ्यांच्या अतिदक्षता विभागात होरपळून मरणाऱ्यांच्या किंकाळ्या राजकीय गोंधळात विरून जातात. नगरच्या इस्पितळात आगीच्या दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यासाठी निमित्त शॉर्टसर्किट ठरले असले तरी आरोग्य व्यवस्थेची ही होरपळ आता तरी थांबायला हवी. अर्थात, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचीही जबाबदारी आहे. सध्या मरण स्वस्त झाले हे मान्य, पण ते इतके अमानुष व क्रूर असावे? सरकारने आता फक्त अश्रू ढाळू नयेत. हे पुनः पुन्हा घडू नये यासाठी काय ठोस पावले उचलणार ते फक्त सांगा!,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button