breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

चित्रपटगृहांना परवानगी, मग तमाशाला का नाही? मराठी तमाशा लोककलावंत परिषदेचा सरकारला इशारा

पुणे | प्रतिनिधी

लोककला असणाऱ्या तमाशा मंडळांना महाराष्ट्र शासनाच्या मदत पुनर्वसन खात्याने खुल्या मैदानावर कार्यक्रम करण्याची परवानगी दिली असतानाही पोलीस प्रशासन तमाशा कार्यक्रमांना परवानगी नाकारत आहे. दुसरीकडे राज्यात राजकीय मेळावे, सभा, नाट्यगृहात कार्यक्रम, मिरवणूक चालू आहेत, असा दुजाभाव होत असल्याचा आरोप करीत १५ डिसेंबरला कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी ठिकाणावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठी तमाशा लोककलावंत परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठी तमाशा लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी दिलेल्या लेखी निवेदनानुसार गेली दोन वर्षे गावगाड्यातील कलावंत उपाशी आहे. आपली उपजीविका काहीतरी मोलमजुरी करून करत आहे. त्यामध्ये आता करोनाचे प्रमाण कमी झाल्याने महाराष्ट्र शासनाने मदत पुनर्वसन खात्याने लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम करण्याची परवानगी दिली. मात्र त्या परिपत्रकामुळे राज्यातील पोलीस प्रशासन तमाशा परवानगी देत नाही. या संदर्भात पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाने ३० ऑक्टोबरला लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाना परवानगी देण्याबाबत एक पत्रक काढले. त्यानुसार सर्व पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त्त याना कळविण्यात आले असतानाही पोलीस विभाग कार्यक्रमांना परवानगी नाकारत आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी पोलीस महासंचालकांना परवानगी देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, खान्देश, विदर्भ, मराठवाडा, नाशिक जिल्ह्यांमध्ये तमाशा फड मालकांना कार्यक्रम करण्यास परवानगी पोलीस प्रशासन परवानगी देत नाहीत आणि परवानगीसाठी दिलेल्या अर्जाची पोच देत नाहीत, हा अजब कारभार पोलीस खात्याचा चालू आहे. अनेक गावच्या यात्रा सुरू आहेत. अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या सभा मोर्चे सुरू आहेत. नाट्यगृहात कार्यक्रम, मिरवणूक असे विविध कार्यक्रम सुरू आहे. अशात तमाशालाच परवानगी का नाकारली जात आहे. त्यामुळे सर्व लोककलाकार एकत्र येऊन १५ डिसेंबरला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजीराजे जाधव यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button