breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

लडाख सीमेलगत चीनची सैन्यतैनाती; लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडून चिंता व्यक्त

लडाख |

लडाख सीमेलगतच्या भागातून सैन्यमाघार घेण्याबाबत भारत-चीनमध्ये चर्चेची तेरावी फेरी सुरू होण्याआधीच त्या भागात चीनने सैन्यतैनाती केल्याची माहिती लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी शनिवारी दिली. चीनने पूर्व लडाख आणि उत्तर आघाडी ते पूर्व विभागापर्यंत सैन्याची तैनात वाढवली असून भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे, असे लष्करप्रमुख नरवणे यांनी नमूद केले. ‘एनएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना नरवणे म्हणाले, ‘‘लडाख परिसरातील चिनी सैन्याच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. आमच्या स्रोतांकडून चिनी सैन्याच्या हालचालींची माहिती मिळत आहे. आम्हीही सीमेवर पायाभूत सुविधा विकसित करीत आहोत. त्यात कुठल्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य तैनातीचाही भाग समाविष्ट आहे. सध्या तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज आहोत.’’

सज्जतेचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख नरवणे पूर्व लडाखमध्ये आले होते. त्यांच्या आगमनात त्यांनी ‘रेझांग ला’ युद्ध स्मारकास भेट दिली. हे ठिकाण ‘रेझांग ला’ आणि ‘रेशिन ला’ दरम्यान आहे. ‘रेझांग ला’ आणि ‘रेशिन ला’ या दोन ठिकाणांहून भारत आणि चीन यांनी फेब्रुवारीत सैन्य माघार घेतली होती. फेब्रुवारीत दोन्ही देशांचे सैन्य आणि रणगाडे काही मीटर अंतरावर सज्ज ठेवण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोग्रा छावणीपासून माघार घेतली, पण हॉट स्प्रिंग हा अद्याप वादाचा मुद्दा आहे. हॉट स्प्रिंगशिवाय चिनी सैन्याने भारतीय सैन्याला देसपांग येथील पठारांवर गस्त घालण्यापासून रोखले असून हे ठिकाण दौलत बेग ओल्डीजवळ उत्तरेकडे आहे.

डेमचोक येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक कथित नागरिकांनी तंबू टाकले आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची दुशान्बे येथे भेट घेतली होती त्या वेळी त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीबाबत चर्चा केली होती. जयशंकर यांनी गोग्रा छावणीपासून माघारीची माहिती त्या वेळी दिली होती, पण अद्यापही प्रश्न प्रलंबित असल्याचे म्हटले होते. गोग्रा येथील गस्त बिंदू ‘१७ ए’पासून चीनने माघार घेण्याचे कबूल केले होते. त्या वेळी ३१ जुलैला १२व्या फेरीची चर्चा दोन्ही देशांत झाली होती. त्या वेळी लष्करप्रमुख नरवणे यांनी असे म्हटले होते, की दोन्ही देशांत सीमा करार होत नाही तोपर्यंत सीमेवरील घडामोडी चालू राहतील. सीमेवरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ‘‘आम्ही चीनच्या कुठल्याही आगळीकीस तोंड देण्यास सज्ज असून यापूर्वी ते दाखवून दिले आहे. सीमा करार होत नाही तोपर्यंत वाद चालू राहणार आहेत. भारत-चीन सीमेवर कायम शांततेसाठी हा करार गरजेचा आहे, असेही नरवणे यांनी त्या वेळी म्हटले होते. लडाख परिसरात चिनी सैन्याच्या हालचालींवर भारताचे लक्ष आहे. आम्हीही सीमेवर पायाभूत सुविधा विकसित करीत आहोत. त्यात सैन्य तैनातीचाही समावेश आहे. सध्या आम्ही कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज आहोत. – एम. एम. नरवणे, लष्करप्रमुख

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button