breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली, च-होली, मोशीत पाणी प्रश्न पेटणार; शेकडो सोसायटीत ‘वापरायला टॅंकर, प्यायला जार’!

  • पाण्याची सोय नसताना बिल्डरांना मिळतोय ना हरकत दाखला
  • नागरिकांची फसवणूक, स्थानिक अकार्यक्षम नगरसेवकांमुळे पाणी प्रश्न प्रलंबित

विकास शिंदे

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून चिखली, च-होली, मोशी परिसरातील शेकडो सोसायटींना पुरेशा पाणी पुरवठा केला जात नाही. त्या सोसायटींना टॅंकरने पाणी पुरवठा होत असून पिण्याच्या पाण्यासह वापरायला टॅंकर आणि बोअरवेलची सोय उपलब्ध आहे. महापालिकेकडून पाणी पुरवठ्याची सोय नसताना बांधकाम व्यवसायांना बिनर्शत ना हरकत दाखला (एनओसी) दिला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पाणी प्रश्न पेटणार असून स्थानिक अकार्यक्षम नगरसेवकांमुळे पाणी प्रश्न प्रलंबित राहिला आहे.

महापालिकेच्या समाविष्ट गावातील हद्दीत अनेक ठिकाणी अजूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. त्यात भोसरी विधानसभा मतदार संघातील मोशी, चिखली, च-होली, डुडूळगाव परिसरातील शेकडो सोसायटीत पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. त्या भागात खासगी टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात खासगी टॅंकर सप्लायर्स चलती आहे. मोठ्या एका सोसायटीस दररोज 20 ते 25 पिण्याच्या पाण्यासह वापरायला खेपा मारतात. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बांधकाम व्यवसायांना सरसकट एनओसी दिल्याने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. पाण्याची सोय उपलब्ध नसताना स्थानिक नगरसेवकांचा टॅंकर सप्लायर्सचा जोरदार धंदा मांडला आहे.

महापालिकेच्या आंद्रा, भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचा काम संथगतीने सुरु आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षात पाणी प्रश्न सुटलेला नाही. महापालिका निवडणुकीत पाणी प्रश्न सुटणार म्हणून आश्वासन द्यायचे, पण सामाविष्ट गावांतील अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत आहे. काही छोट्या-मोठ्या नागरी वस्त्यांवर पाण्याची टंचाई जाणवत आहे.

मागील महापालिका निवडणुकीत पाणी पुरवठा सुरळीत करु, अशा वल्गना त्या-त्या भागातील नगरसेवकांनी केल्या, पण गेल्या पाच वर्षात पाणी प्रश्न सोडविता आला नाही. अनेक ठिकाणी महापालिकेचा कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय, तर काही ठिकाणी पाणी पुरवठा न झाल्याने टॅंकरने पाणी देण्याची वेळ आली. महापालिका माणसी 135 लीटर पाण्याऐवजी 150 लीटर पाणी देते. तरीही भोसरी, चिखली, मोशी, च-होली, डुडूळगावसह अनेक भागांत सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. त्या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी खासगी टॅंकरने पुरवले जात आहे. तसेच अनेक सोसायटी स्वताः टॅंकरने पाणी मागवून घेत आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेवक असून अडचण, नसून खोळंबा, अशी अवस्था झालेली आहे.

टॅंकर सप्लायर्सचा धंदा!
महापालिका संकेतस्थळावर पाणी पुरवठा विभागाने खासगी टॅंकर सप्लायर्सची यादी दिली आहे. नागरिकांकडून मिळेल तेवढी रक्कम खासगी टॅंकर सप्लायर्स वसूल करीत आहेत. विशेषतः पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून खासगी टॅंकर सप्लायर्स भोसरी, चऱ्होली, चिखली, मोशी, डुडूळगाव परिसरातील सोसायटीसह छोट्या-मोठ्या नागरी भागात पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरने नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहेत. साधारणतः एक टॅंकर दिवसात 7 ते 8 खेपा करतात. लांबचा पल्ला, डिझेलचे वाढलेले दर या कारणांनी एका टॅंकरला सुमारे 1200 ते 1500 रुपये घेतले जातात. महापालिकेच्या पाण्याची सोय नसताना बिल्डरांना एनओसी दिली. बिल्डरांनी नागरिकांच्या नागरिकांना सदनिका विकल्या. पण, पालिकेच्या पाण्याची सोय नसल्याने सोसायटीचा टॅंकरचा आर्थिक भार तेथील नागरिकांवर पडू लागला आहे.

नगरसेवकांना सोसायटीत ‘नो एन्ट्री’

महापालिका हद्दीत समाविष्ट गावातील शेकडो सोसायटीमध्ये महापालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे त्या-त्या भागात पाणी पुरवठा टॅंकरने केला जातो विशेषता, चिखली, मोशी, च-होली भागात पाणी प्रश्नामुळे नागरिक हैराण आहे. त्यामुळे चिखलीतील रिव्हर रेसीडेन्सी सोसायटीने स्थानिक नगरसेवकांना प्रवेश बंदी घातली आहे. या सोसायटीचा कित्ता परिसरातील सोसायटी देखील भविष्यात गिरवणार आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांना आगामी निवडणुकीत पाणी प्रश्नावरुन नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button