breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

‘संजूआत्या गेली, शेवटचा दुवा निखळला’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक

मुंबई : थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या त्या आत्या होत्या. त्यांच्या निधनाने ठाकरे आणि करंदीकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संजीवनी करंदीकर म्हणजे आमच्या आत्या. त्यांना समृद्ध वारसा लाभला आणि त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने आमचा शेवटचा दुवाही निखळला, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, “संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेनाप्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला व त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा छंदही अफाट होता”

“प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत. सगळ्यात छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजूआत्यावर विशेष लोभ होता व संजूआत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही श्रद्धांजली

प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दु:ख व्यक्त केले असून संजीवनीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

संजीवनीताईंच्या माध्यमातून प्रबोधनकारांच्या तसंच बाळासाहेबांच्या अनेक वैयक्तिक आठवणींना उजाळा मिळायचा. त्यांच्या निधनानं बाळासाहेबांच्या भावंडांतील अखेरचा दूवा निखळला आहे. ठाकरे व करंदीकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो. संजीवनीताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button