breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल; आता १२ ऑगस्टला होणार परीक्षा

मुंबई – पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा यंदा ९ ऑगस्टला घेण्याचे निश्‍चित केले होते, मात्र शिक्षण विभागाने या तारखेत पुन्हा बदल केला असून आता ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.

दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येते. परंतु यंदा कोरोनामुळे या परीक्षेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. आतापर्यंत या परीक्षेची तारीख पाच वेळा बदलण्यात आली आहे. सुरुवातीला ही परीक्षा फेब्रुवारीऐवजी २५ एप्रिलला घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर २३ मे ही नवी तारीख निश्चित करण्यात आली. परंतु त्याचदरम्यान कोरोनाची दुसरी लाट आल्याने परीक्षा पुन्हा लांबणीवर गेली. मग २१ जून रोजी परीक्षा घेण्याचा विचार झाला, परंतु तेव्हाही तारीख पुढे ढकलण्यात आली आणि अखेर ८ ऑगस्ट ही तारीख निश्‍चित करून परीक्षा परीषदेकडून सर्व नियोजन करण्यात आले होते. मात्र त्याच दिवशी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स पदाचीही परीक्षा होती.

या परीक्षेसाठी नेमकी शिष्यवृत्ती परीक्षेचीच केंद्रे अधिग्रहित करण्यात आली होती. त्यामुळे तारीख पुन्हा बदलून ९ ऑगस्ट करण्यात आली. मात्र ९ ऑगस्टला ‘जागतिक आदिवासी दिन’ असल्याने काही आदिवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच काही दिवसांपूर्वी राज्यात उद्भवलेली पूरस्थिती, काही भागांत झालेले भूस्खलन यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना दळणवळणाच्या साधनांमध्ये अडचण येऊ शकते, हे लक्षात घेता या परीक्षेच्या तारखेत बदल करण्याच्या काही संघटनांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा तारीख बदलण्यात आली आहे. आता १२ ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार असून यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद उपायुक्त शैलजा दराडे यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे १० लाखांहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु यंदा कोरोनामुळे या संख्येत घट झाली आहे. यंदा राज्यातील ४७ हजार ६१२ शाळांमधील ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गातील ३ लाख ८८ हजार ३३५ आणि आठवीच्या वर्गातील २ लाख ४४ हजार १४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button