कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल आता हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या आघाडीवर आहेत तर भाजपचे सत्यजित कदम हे पिछाडीवर आहेत. सध्याच्या या निकालावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली, आम्हाला राज्यात काम करण्यासाठी फक्त पाच वर्षे मिळाली. पण यामध्ये आम्ही कोल्हापूरच्या विकासासाठी गोष्टी मांडल्या. अखेर कोणाला कौल द्यायचा हे मतदारांनी ठरवायचं असतं, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
इतकंच नाहीतर ‘अद्यापही सहा फेऱ्या बाकी आहेत. चमत्कार हा चमत्कार असतो. भाजप विजयी झाला असता तरीदेखील सत्ताधाऱ्यांनी टीका केली असती आणि पराभव झाला असता तरीही टीका करतील. मला टीकांची सवय झाली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या पराभवानंतर तुम्ही हिमालयात जाणार का? असा प्रश्न विचारला असता, ‘मला कुठे जायचं आहे हा माझा आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे’ असेही उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.