breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

साेमय्‍यांच्‍या आरोपांमागील मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच : हसन मुश्रीफ

मुंबई – माझ्‍याविरोधातील आरोप हे भाजपचे षड्‍यंत्र आहे. किरीट सोमय्‍यांकडून माझ्‍यावर करण्‍यात येणार्‍या आरोपामागील मास्टरमाईंड हे भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील हेच आहेत, असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केला.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ म्‍हणाले, चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष आहेत. प्रदेशाध्‍यक्षांच्‍या जिल्‍ह्यातच विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभावला सामोरे जावे लागले हाेते. कोल्‍हापूरमध्‍ये भाजपचा झालेला पराभवाला मी जबाबदार असल्‍याने माझ्‍यावर निराधार आरोप केले जात आहेत.

मला भाजपमध्‍ये येण्‍याची दिली होती ऑफर
मला भाजपमध्‍ये येण्‍याची ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मी ती धुडकावली. राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍येच राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले हाेते. यानंतर माझ्‍यावर आरोप सुरु करण्‍यात आले. तसेच माझ्‍यावर आयकर विभागाची कारवाईही करण्‍यात आली. माझा आवाज दाबण्‍याचा प्रयत्‍न भाजप करत आहे, असेही मुश्रीफ म्‍हणाले.

माझ्‍याविरोधातील पाठीमागून आरोप करण्‍यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी थेट माझ्‍याशी लढाई करावी. कोणाचाही आधार घेवून माझ्‍यावर व माझ्‍या कुटुंबियांवर खोटे आरोप करु नयेत, असे आव्‍हानही मुश्रीफ यांनी दिले.

आरोप करण्‍यापूर्वी अभ्‍यास करावा
आप्‍पासाहेब नलवडे साखर कारखान्‍यात मी १०० कोटींचा घोटाळा केल्‍याचा आरोप साेमय्‍या यांनी केला आहे. यासंदर्भात कोल्‍हापूर जिल्‍हा बँकेने कोणतीही निविदा काढलेली नाही. तसेच कारखाना कोणासही चालविण्‍यास दिलेला नाही. आरोप करण्‍यापूर्वी सोमय्‍या यांनी अभ्‍यास करावा, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

राज्‍य सरकारने २०१३ मध्‍ये आप्‍पासाहेब नलवडे गडहिंग्‍लज तालुका सहकारी साखर कारखाना हा दहा वर्षांच्‍या करारावर ब्रिक्‍स इंडिया कंपनीस चालविण्‍यास दिला होता. आर्थिक तोटा होत असल्‍याने या कंपनीने २०२०मध्‍ये हा कारखाना सोडला. माझ्‍यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. यामध्‍ये कोणतेही तथ्‍य नाही. साखर कारखान्‍या॑वर साेम बोलण्‍यापूर्वी भाजप नेते नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घ्‍यावे, असा सल्‍लाही त्‍यांनी सोमय्‍या यांना दिला.

मला घोटाळेबाजी म्‍हणण्‍याचा सोमय्‍या यांना अधिकार नाही. माझ्‍यावर आरोप करा; पण ते आरोप सिद्‍ध झाल्‍यासारखे तुम्‍ही विधाने करु शकत नाही. तुम्‍ही तक्रार करा, याचा तपास होवू देत, यापूर्वीच तुम्‍ही मला घोटाळेबाज कसे ठरवता, असा सवालही त्‍यांनी केला. मंत्री म्‍हणून माझ्‍यावर आजपर्यंत कधीही आरोप झालेले नाहीत. भाजप नेत्‍यांचे घोटाळेही किरीट सोमय्‍या यांनी उघड करावेत, असे आव्‍हान ही केले.

निराधार आरोप करत भाजप राज्‍य सरकारला बदनाम करत आहे. यापुढे आता चंद्रकांत पाटील यांचाही घोटाळा मी उघड करणार आहे. भाजपच्‍या नेत्‍यांचेही घोटाळे मी उघड करणार आहे. माझ्‍याविरोधातील कारस्‍थान कधीच यशस्‍वी होणार नाही, असाही दावा त्‍यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button