ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील सहमत

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार  आणि त्या पक्षाची प्रत्येक कृती ही जातीशी निगडीत असते. सर्वसामान्य कुटुंबांतील माणसे मोठी झालेली त्यांना पाहावत नाहीत. घराणेशाही आणि नातेवाईकांचे हितसंबंध जोपासण्याचे राजकारण राष्ट्रवादीने केले. राष्ट्रवादीने प्रत्येक मतदारसंघात जातीयवादी राजकारण केले. हा पक्ष मतदारसंघात जातनिहाय मतदारपाहून गणितं आखतो. राष्ट्रवादी हा खरा जातीयवादी पक्ष आहे.’ असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी केला.

कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचे राजकारण वाढले या वक्तव्यावर आपण २०० टक्के सहमत आहोत असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. ठाकरे यांचे शनिवारी झालेले भाषण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आठवण करुन देणारे होते. राज ठाकरे यांच्या भाषणाने सामान्य हिंदूना समाधान वाटले अशी पुस्तीही चंद्रकांत पाटील यांनी जोडली. माझ्यासारखा, सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्याची आठ खाती सांभाळली हे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना सहन होत नाही. म्हणून दोन्ही काँग्रेसचे नेते माझ्यावर टीका करत असतात सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारखा मी काही सोन्याचा चमचा घेउन जन्माला आलो नाही,’ असा टोलाही त्यांनी लगाविला.

युपीएचे नेतृत्व करण्यास शरद पवार यांनी नकार दिल्याकडे लक्ष वेधले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘बुडत्या जहाजाचे कॅप्टनशिप स्वीकारायला कोणी तयार नसते, म्हणून शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करण्यास नकार दिला असावा. पवारच जर यूपीएचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार देत असतील तर शिवसेनेचे खासदार संजय राउत यांची त्यासंबंधीची उठाठेव कशासाठी ? ‘असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार मिळत आहे. यामुळे धास्तावलेली महाविकास आघाडी, मतदारांच्या खात्यावर पेटीएमद्वारे काळा पैसा वाटप करण्याची पूर्वतयारी करत आहे. एका इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यामार्फत मतदारांची माहिती संकलित करत आहेत. या प्रकाराविषयी निवडणूक आयोग आणि ईडीकडे तक्रार करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पवार खासदार संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त केल्यानंतर शरद पवारांनी त्याला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेवर खासदार नियुक्ती झाल्यानंतर ‘आता पेशवे, राजे ठरविणार का ?’असे विधान पवार यांनी केले होते. पवार यांच्या पक्षाने संभाजीराजे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि पाडलं. आमच्या कालावधीत त्यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती झाली. कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर पवार यांनी त्या प्रकरणाला ब्राह्मण आणि ब्राम्हणेतर रंग देण्याचा प्रयत्न केला होता.

सतेज पाटलांनी तारीख ठरवावी, चर्चेला मी निश्चित येईल

‘विकासकामासंबंधी जाहीर चर्चा करायला आपण तयार आहोत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी तारीख ठरवावी, मी चर्चेसाठी निश्चित येईल. बिंदू चौकात जाहीर सभा होत नाहीत, मिरजकर तिकटीला जाहीर चर्चा करू, मी निश्चित येईन’,अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी जाहीर चर्चेचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात टाकला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button