TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

गोखले पूल हलक्या वाहनांसाठी सुरू होण्याची शक्यता धूसर

मुंबई: अंधेरीमधील गोखले पूल पादचारी, दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याबाबत आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय या दोन संस्थांनी सादर केलेल्या अहवालात तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी,  गोखले पूल पादचारी, दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याची शक्यता धूसर बनली आहे. मात्र या संदर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा गोखले पूल धोकादायक बनल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र परिसरातील नागरिक आणि वाहतुकीचा प्रश्न जटील बनल्यामुळे  हा पूल पादचारी, दुचाकी तसेच हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का याची चाचपणी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली होती. पुलाच्या दोन मार्गिका ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवता येतील का यादृष्टीने त्याची संरचनात्मक तपासणी करण्याची विनंती करणारे पत्र मुंबई महानगरपालिकेने आयआयटी, मुंबई आणि व्हीजेटीआय या संस्थांना पाठविले होते. मात्र या दोन्ही संस्थानी सादर केलेल्या अहवालात तफावत आढळून आली आहे.

या दोन्ही संस्थानी पुलाची पाहणी करून आपापला अहवाल सादर केला आहे. यावेळी पुलाची संरचनात्मक तपासणी करण्यात आलेली नाही. मात्र काही दुरुस्ती करून पुलाचा जुना भाग सुरू ठेवता येईल, असे व्हीजेटीआयच्या अहवालात म्हटले आहे. तर मधल्या दोन मार्गिका सुरू ठेवता येऊ शकतात, त्यासाठी दुरुस्तीची गरज नाही, असे आयआयटी, मुंबईच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे. या संदर्भात लवकरच मुंबई महानगरपालिका प्रशासन निर्णय घेणार आहे.

अंधेरीचा गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाचे संपूर्ण बांधकाम महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. तर  रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा धोकादायक भाग पडण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र हा पूल पुढचे काही दिवस हलकी वाहने आणि पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होती. या पुलाचा रेल्वेच्या हद्दीतील भाग व जुना पूल  धोकादायक बनला असून तो तत्काळ पाडून टाकावा, असे महानगरपालिकेच्या सल्लागाराने नियमित तपासणीनंतर सादर केलेल्या अहवालात म्हटले होते. त्यानंतर तातडीने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे हा पूल पादचारी आणि दुचाकी, रिक्षा अशा हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का याची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका व्हीजेटीआय आणि आयआयटी अशा नामांकित संस्थांची मदत घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button