पिंपरी / चिंचवड

रहाटणीत पेट्रोल पंपावर कार चालकाला बेदम मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

पेट्रोल पंपावरून डिझेल भरून बाहेर पडत असताना दोन दुचाकीस्वारांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने चौघांनी मिळून कार चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना 30 डिसेंबर रोजी नखाते पेट्रोल पंप, नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली. याप्रकरणी ६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश किसन जाधव (वय 36, रा. पाटील नगर, थेरगाव) असे मारहाण झालेल्या कार चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन दुचाकीवरील अनोळखी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे त्यांच्या कारमध्ये डिझेल भरण्यासाठी रहाटणी येथील नखाते पेट्रोल पंपावर गेले. तिथे डिझेल भरल्यानंतर ते पेट्रोल पंपावरून बाहेर पडत होते. त्यावेळी दोन दुचाकी रस्त्याच्या मध्ये असल्याने त्यांची कार बाहेर निघत नव्हती. त्यामुळे जाधव यांनी दोन दुचाकीस्वारांना त्यांच्या दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून दोन दुचाकीवरील चार जणांनी मिळून जाधव यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात जाधव जखमी झाले. त्यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर याबाबत फिर्याद दिली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button