breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

करोनाचा इलाज म्हणून लाल मुंग्यांची चटणी खाण्यास सांगू शकत नाही: सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली |

लाल मुंगीच्या चटणीवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. करोनावर उपचार म्हणून ही चटणी वापरण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी ओडिशातील अभियंता आणि संशोधक नायधर पाढियाल यांनी केली होती. यावेळी “आम्ही संपूर्ण देशाला करोनाचा इलाज म्हणून लाल मुंग्यांची चटणी वापरण्यास कसे सांगू शकतो?” असा सवाल न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने वकिलाला विचारला. “जर तुम्हाला ती चटणी वापरायची असेल तर वापरा. कोणीही तुम्हाला रोखत नाहीये पण आम्ही संवैधानिक न्यायालय म्हणून लोकांना करोनाच्या उपचारासाठी लाल मुंगीची चटणी खाण्यास सांगू शकत नाही. लाल मुंगीची चटणी करोनापासून लोकांचे संरक्षण करू शकते, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.” असं खंडपीठाने म्हटलंय.

याचिकाकर्त्याच्या बाजूने, वकील अनिरुद्ध सांगानेरिया म्हणाले की, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाल मुंगीच्या चटणीची प्रभावीतता अनेक शतकांपासून सिद्ध झाली आहे. आयुष मंत्रालय आणि सीएसआयआरने वैज्ञानिक दाव्यांची पडताळणी न करताच ही मागणी फेटाळून लावली. यावर कोर्टाने म्हटलं की, “अनेक लोक अनेक रोगांवर उपचार करण्याच्या विविध पारंपारिक पद्धती वापरतात परंतु ते घटनात्मक न्यायालयाच्या आदेशात बदलत नाहीत. आम्ही असे कोणतेही निर्देश देऊ शकत नाही. आयुष मंत्रालयाने आणि सीएसआयआरने ते फेटाळण्यापुर्वी तुमच्या दाव्यांचा विचार केला होता,”असेही कोर्टाने म्हटले आहे.

शेवटी न्यायमूर्त चंद्रचूड यांनी वकिलाला म्हटलं, की याचिकाकर्त्याला सांगा की चटणीवर अवलंबून न राहता शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घ्या. यावर त्याने लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं वकिलांनी सांगितलं. ओडिशा आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमधील आदिवासी पट्ट्यात लाल मुंगीची चटणी वापरतात. फ्लू, खोकला, सर्दी, श्वसनास त्रास, थकवा आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी चटणीचा वापर करतात. ही चटणी लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्यांपासून बनवली जाते. २०१० मध्ये भारतीय अन्नपदार्थांवरील माहितीपटासाठी भारतभर प्रवास करणाऱ्या ब्रिटीश सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रामसे यांना छत्तीसगडच्या भेटीदरम्यान लाल मुंगीच्या चटणीची माहिती मिळाली. त्यांनी २०१८ मध्ये या चटणीचा समावेश आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांवरील त्यांच्या माहितीपटात केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button