पिंपळे गुरव येथे दीड लाखांची घरफोडी
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपळे गुरव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 12) मध्यरात्री बारा ते सकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली.
अशोक गणपत उत्तेकर (वय 52, रा. शिवरामनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शनिवारी मध्यरात्री बारा ते सकाळी सहा वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन सोन्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याच्या दोन रिंगा, कानातील सोन्याचे टॉप्स, एक सोन्याची ठुशी, एक टायटन कंपनीचे लेडीज घड्याळ, सात हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख 44 हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी तपास करीत आहेत.