रहाटणीत सव्वा लाखाची घरफोडी
पिंपरी l प्रतिनिधी
रहाटणी येथे सायंकाळी साडेपाच ते पावणे आठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एका घरात चोरी केली. चोरट्यांनी एक लाख 23 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 14) घडली.
भारती अंबादास पांढरे (वय 36, रा. गजानन कॉलनी, रहाटणी) यांनी याप्रकरणी गुरुवारी दि. 17 वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लाॅक तोडून 80 हजारांचे मनी मंगळसूत्र, आठ हजारांची सोन्याची अंगठी, 20 हजारांचे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजार रुपये किमतीचे चांदीचे 15 शिक्के असा एकूण एक लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सायंकाळी साडेपाच ते पावणे आठ वाजताच्या कालावधीत घडली. पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप तपास करीत आहेत.