‘देश समजण्यासाठी विदेशी भाषा पुरेशी नाही’, अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Amit Shah : राष्ट्राची ओळख त्यांच्या भाषेमुळे होते, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय भाषांबाबत मोठी टिप्पणी केली. ते म्हणाले की, आम्ही भारताच्या भाषिक वारशाला पुन्हा एकदा मिळवू इच्छितो. देशी भाषांचा गौरव करतानाच आता जगाचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे.
माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांनी लिहिलेल्या “मै बूंद स्वयं, खुद सागर हूं” या पुस्तकाचे प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले, “या देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल. केवळ दृढनिश्चय असलेले लोकच बदल घडवू शकतात आणि अशा समाजाची निर्मिती आता दूर नाही.”
हेही वाचा – कम ऑन किल मी… उद्धव ठाकरेंच्या चॅलेंजवर एकनाथ शिंदे यांचं खणखणीत उत्तर, म्हणाले, मरे हुए को…
“देशातील भाषा आपल्या संस्कृतीमधील रत्न आहेत. आपल्या भाषा वगळल्या तर आपण खरे भारतवासी राहणार नाहीत. आपला देश, संस्कृती, इतिहास आणि धर्माला समजून घेण्यासाठी कोणतीही विदेशी भाषा पुरेसी नाही”, असेही अमित शाह म्हणाले.
अमित शाह यांनी यावेळी पंतप्रधान मोदींच्या पंच प्राण या उपक्रमाचा दाखला दिला. विकसित भारताचे लक्ष्य गाठणे, गुलामीच्या प्रत्येक विचारातून मुक्ती मिळवणे, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि एकजुटता राखणे आणि प्रत्येक नागरिकाप्रती कर्तव्याची भावना जागवणे, अशा या पंचसुत्रीचा उल्लेख अमित शाह यांनी केला. या पाच प्रतिज्ञा देशातील नागरिकांचा संकल्प बनल्या आहेत, असेही ते म्हणाले.