#CoronaVirus: मदत म्हणून इटलीने दिलेलं वैद्यकीय साहित्य चीन इटलीलाच विकतोय

जगभरामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. अमेरिका, इटली, फ्रान्स, स्पेनसारख्या देशांमध्ये दिवसाला शेकडो जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. अस अतानाच दुसरीकडे ज्या चीनमधून या विषाणूचा जगभरामध्ये फैलाव झाला तेथे मात्र मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आता चीनमधून इतर देशांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क, करोनाचा चाचणीसाठी लागणारे पीईई कीट्स आणि इतर वैद्यकीय सामानाचा समावेश आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
चीनमधील वुहान शहरामध्ये करोनाने थैमान घातलं होतं त्यावेळी इटलीने चीनला मदत म्हणून काही वैद्यकीय साहित्य पाठवलं होतं. यामध्ये प्रामुख्याने पीपीई कीट्स म्हणजेच करोनाचा चाचणीच्या कीट्सचा समावेश होता. मात्र त्यानंतर हळूहळू चीनमधील प्रादुर्भाव कमी झाला आणि इटलीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला. इटलीमध्ये करोनामुळे दहा हजारहून अधिक जणाचा मृत्यू झाला असून देशभरात करोनामुळे भीतीचे वातावरण आहे. आता चीनने इटलीला पीपीई कीट्स मदत म्हणून पाठवण्याची घोषणा केली आहे. मात्र ‘द स्पेक्टेटर’ या ब्रिटीश मासिकाने चीन पीपीई कीट्स इटलीला मदत म्हणून मोफत देण्याऐवजी विकत असल्याचा दावा केला आहे. जे कीट्स इटलीने चीनला मदत म्हणून पाठवले होते तेच कीट्स आता चीनकडून इटलीला विकत असल्याचे मासिकामधील एका वृत्तामध्ये म्हटलं आहे.