कोल्हापूरात आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन
कोल्हापूर – जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता उद्या बुधवार 5 मेपासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या त्याप्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसीव्हीरची भासणारी कमतरता पाहता आज तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले कि, जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रुग्णसंख्या आणखी वाढत चालली तर ऑक्सिजनची गरज अधिक वाढेल. वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजल्यापासून कडकडीत लॉकडाऊन करावा. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना सूट देऊन कडकडीत लॉकडाऊन करावा असे म्हटले. तर जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्ह्यातील 2400 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन पुरवला जात आहे. त्यामुळे उद्या बुधवार 5 मे पासून सकाळी 11 वाजल्यापासून पुढील 10 दिवस जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.





