‘हा’ टॅक्स ठरला पंतप्रधानांच्या राजीनाम्यास कारणीभूत!

लेबनान या देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा देण्यास एक टॅक्स कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. या देशात व्हाट्स अॅप, फेसबुक मेसेंजरवर मेसेज किंवा कॉलिंगवरील टॅक्सचा विरोध एवढा वाढला की, अखेर पंतप्रधान साद हरीरी यांना राजीनामा द्यावा लागला. तेथील सरकारकडून व्हाट्स अॅप, फेसबुक मेसेंजरवरील मेसेज व कॉलवर टॅक्स आकारला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरातील नागरिक एकवटले व जोरदार निदर्शनं सुरू झाली. या निर्णयामागे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असा सरकारचा हेतू होता, असे सांगण्यात आले आहे.
या अॅपच्या माध्यमातून कॉलिंग करणाऱ्यांना रोज ०.२० डॉलर टॅक्स द्यावा लागणार होता, जो साधारण १४ रुपयांच्या आसपास होतो. या निर्णयाविरोधात लेबनानमधील जनता रस्त्यांवर उतरली. १२ दिवासंपासून येथील बँका, शाळा, कार्यालये व महाविद्यालयं बंद आहेत. अखेर जनतेच्या तीव्र विरोधासमोर सकारला झुकावेच लागले व टॅक्सचा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा करावी लागली. मात्र तरी देखील नागिरकांचे आंदोलन थांबले नाही, लोकं रस्त्यांवर जमू लागले. हे आंदोलन आता देशातील भ्रष्टाचार, वाढती महागाई व कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात सुरू झाले.




