हा चंद्र जिवाला लावी पिसे! थोड्याच वेळात चांद्रयान २ झेपावणार
चंद्र हा सगळ्यांनाच मोहित करणारा आहे. कवींचा तर तो लाडका मित्र माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं त्या गोष्टीलाही आता ५० वर्षे पूर्ण झाली. भारताची चांद्रयान मोहीम२ काही वेळातच राबवली जाणार आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये चांद्रयान २ चे प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान २ चे प्रक्षेपण झाल्यानंतर हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी होणारं हे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्त्रोने आज म्हणजेच सोमवारी दुपारी २.४३ मिनिटांची वेळ चांद्रयान२ मोहिमेची वेळ निश्चित केली. आता अवघ्या काही मिनिटांमध्येच चांद्रयान २ मोहीम राबवली जाईल.
चंद्रापासून ३० किमी अंतर राहिल्यानंतर चांद्रयान २ चा वेग कमी करण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची १५ मिनिटं महत्त्वाची आहेत असं के. शिवन यांनी म्हटलं आहे. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास तो जगातला चौथा देश ठरणार आहे.