राज ठाकरेंच्या मनसेचा काँग्रेसच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा

पेट्रोल, डिझेलची दिवसेंदिवस सुरू असलेली प्रचंड दरवाढ, गगनाला भिडलेली महागाई, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. आज सकाळी १०.३० वा. मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-ठाणे येथील नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष व विभाग अध्यक्षांची महत्वाची बैठक घेतली त्यानंतर मनसे उद्या पूर्णपणे या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
उद्या सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत काँग्रेसकडून ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ‘भारत बंद’ला पाठिंबा देतील अशी माहिती राज ठाकरे यांनी बैठकीनंतर जाहीर केलेल्या एका पत्राद्वारे दिली. त्याचबरोबर ‘भारत बंद’ला रस्त्यावर उतरुन मनसे कार्यकर्ते पाठिंबा देतील, पण याचबरोबर कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जावी असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
केंद्रातील भाजपा सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी, कामगार संघटना, टॅक्सी, रिक्षाचालक संघटना, दुकानदार, व्यापारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले होते. केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेना व मनसेनेही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते, त्याला राज ठाकरेंनी प्रतिसाद दिला आहे.