भारताला झटका; पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीनं सोडलं नागरिकत्व
पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून देश सोडून गेलेला आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचा मार्ग आता आणखी बिकट होणार आहे. कारण चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले आहे. एबीपीच्या वृत्तानुसार, चोक्सीने भारतीय पासपोर्ट एंटीगुआ उच्च आयोगामध्ये जमा केला आहे.
मेहुल चोक्सीने आपला पासपोर्ट क्र. Z3396732 कन्सिल्ड बुकसोबत जमा केला आहे. भारतीय नागरिकता सोडण्यासाठी त्याला १७७ डॉलरचा ड्राफ्टही जमा करावा लागला आहे. याबाबतची सूचना परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी गृहमंत्रालयाला दिली आहे. नागरिकता सोडण्याच्या फॉर्ममध्ये चोक्सीने आपला नवा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस, एंटीगुआ असा नोंदवला आहे.
चोक्सीने उच्च आयोगाला सांगितले की, त्याने आवश्यक नियमांसह एंटीगुआचे नागरिकत्व स्विकारत भारताचे नागरिकत्व सोडले आहे. खरतंर चोक्सीने नागरिकत्व सोडण्यामागे प्रत्यार्पणापासून वाचण्याची धडपड हे कारण आहे. याप्रकरणी २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने चोक्सीचे नागरिकत्व सोडल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालय आणि चौकशी एजन्सींकडून प्रगती अहवाल मागवला आहे. २०१७मध्ये चोक्सीने एंटीगुआचे नागरिकत्व घेतले होते. त्यावेळी भारताने यावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता. मुंबई पोलिसांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्याला तिकडे नागरिकत्व मिळाले आहे.
पीएनबी घोटाळा उघड होण्यापूर्वीच मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे देश सोडून पळून गेले. या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि ईडी करीत आहेत. आजवर या दोघांची चार हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या दोघांविरोधात आर्थिक फरार अधिनियमांतर्गत कारवाई केली जात आहे.