Breaking-newsआंतरराष्ट्रीय
पाकिस्तानमध्ये प्राथमिक शाळा बॉम्बने उडवली

पेशावर- पाकिस्तानमधील वायव्येकडील भागातील मुलांची प्राथमिक शाळा तालिबान्यांनी रविवारी बॉम्बने उडवून दिली. अफगाणिस्तानच्या सीमेलगत आदिवासी पट्टयात असलेल्या चित्राल जिल्ह्यातल्या अंद्रादु गावात ही शाळा होती. अतिदुर्गम खैबर पख्तुनवा प्रांतात ही एकमेव शाळा होती. शाळेच्या सीमेवरील भिंतींमध्ये बॉम्ब पेरून ठेवण्यात आले होते. त्या बॉम्बच्या स्फोटांमुळे शाळेच्या दोन खोल्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आणि मुख्य इमारतीचेही बरेच नुकसान झाले, असे पोलिसांनी सांगितले.
या शाळेमध्ये 80 ते 90 विद्यार्थी शिक्षण घेत असतात. रविवारी शाळा बंद असल्यामुळे शाळेत कोणीही विद्यार्थी नव्हते. त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तेहरीक ए तालिबान पाकिस्तान आणि जमातुल अहरार या दोन संघटनांनी या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली आहे. या भागातील मुलींच्या प्राथमिक शाळेवर तालिबान्यांनी पूर्वी हल्ले केले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी हे पाकिस्तानच्या वायव्य भागातील शेकडो शाळांवर पूर्वी हल्ले केले आहेत. गेल्या महिन्यात तालिबान्यांनी गिलगिट बाल्टीस्तान भागातील 12 शाळा पेटवून दिल्या होत्या. गेल्या 10 वर्षात तालिबान्यांनी पाकिस्तानातील 1,500 शाळा उद्ध्वस्त केल्या आहेत.