निवडणुकांसाठीच एअर स्ट्राइक, फारुख अब्दुल्लांचा आरोप
लोकसभा निवडणुकीबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार नसल्यामुळे नॅशनल कॉन्फरसचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये अशी परिस्थिती निर्माण होणे हे मोदी सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर सर्व पक्षांना राज्यात निवडणुका हव्या असतील तर लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका का होऊ शकत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. निवडणुका जवळ आल्यामुळेच बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले, सर्व पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेण्याच्या बाजूने आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण अनुकूल आहे. मग जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण अनुकूल नाही का, असा सवाल त्यांनी केला. स्थानिक पंचायत निवडणूक शांततेत झाली. इथे पुरेसे सुरक्षा बल उपलब्ध आहे. मग का विधानसभा निवडणुका होऊ शकत नाहीत ?
एअर स्ट्राइकबाबत बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तानबरोबर छोटे युद्ध होईल, याची आम्हाला माहिती होती. मात्र निवडणुका जवळ असल्यामुळे एअर स्ट्राइक करण्यात आले. आम्ही कोट्यवधी रुपयांचे एअरक्राफ्ट गमावले. नशिबाने पायलट वाचले आणि सुखरुप परतले. दरम्यान, बसपा प्रमुख मायावती यांनीही जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांवरुन टीका केली.