कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 70 टक्के मतदान

नवी दिल्ली -कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज शांततेत 70 टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ समाप्त झाल्यानंतरही काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे अंतिम आकडेवारी हाती आल्यावर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
कर्नाटकमध्ये विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. त्यातील 222 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत 2 हजार 600 हून अधिक उमेदवार त्यांचे भवितव्य आजमावत आहेत. त्या राज्यातील एकूण मतदारांची संख्या 5 कोटींहून अधिक आहे. मागील विधानसभा निवडणुकीत (2013) 71.4 टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता. त्या राज्यात यावेळीही कॉंग्रेस, भाजप आणि जेडीएस अशी तिरंगी लढत अनुभवयास मिळत आहे. त्यातही सत्तेसाठी प्रामुख्याने कॉंग्रेस आणि भाजपमध्ये कॉंटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या निकालामुळे (15 मे) कर्नाटकची सत्ता कुणाकडे ते स्पष्ट होईल.