कठुआ बलात्कार : मुख्य आरोपी म्हणतो, ‘मी तर पीडितेच्या आजोबांसारखा’

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणात आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी सांजी राम याने सर्वोच्च न्यायालयासमोर स्वतःला निष्पाप असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर मी पीडितेच्या आजोबांप्रमाणे असल्याचंही त्याने कोर्टासमोर म्हटले.
मला या प्रकरणात गोवले गेल्याचंही सांजी रामने कोर्टात सांगितले. ज्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, ती माझ्या नातीसारखी होती. तिच्यासोबत मी असे कृत्य कसे करेन?, असेदेखील तो म्हणाला. कठुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ७ मे रोजी होणार आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला जावा, अशी विनंती आरोपींनी केली आहे, तर पीडितेच्या वडिलांनी हा खटला चंदीगड येथे वर्ग करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.