इस्त्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर भाजपात, अमित शाहंच्या उपस्थितीत प्रवेश

इस्त्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. माधवन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत. १९९८ मध्ये त्यांना पद्मभूषण आणि २००९ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. केरळमधील तिरुअनंतपूरम येथे राहणारे माधवन यांनी १९६६ मध्ये केरळ विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रातून त्यांनी प्रशिक्षण घेतले.
इस्त्रोचे अध्यक्षपद सांभाळण्यापूर्वी त्यांनी अनेक महत्वपूर्ण कामगिरीत आपले योगदान नोंदवलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात इस्त्रोने २५ यशस्वी मोहिमा पार पाडल्या. यामध्ये कार्टोसॅट १, हेमसॅट १, इन्सॅट ४ अ, पीएसएलव्ही सी ५, जीएसएलव्ही एफ १ ते पीएसएलव्ही १२, पीएसएलव्ही सी १४ आणि ओशनसॅट २ सह आणखी काही मोहिमांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्यांनी अनेक अंतराळ संस्था आणि फ्रान्स, रशिया, बाझील, इस्त्रायलसारख्या देशांबरोबर द्विपक्षीय सहकार्य करार आणि चर्चांसाठी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सहकार्य करार विकसित करण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.