ताज्या घडामोडीपुणे

‘ब्राह्मणांनो, जाती संपविण्यासाठी एकत्र या’, अभिनेते शरद पोंक्षेंचे आवाहन

पुणे|‘जातीयवाद्यांनी राज्यातील वातावरण गढूळ केले आहे. ते स्वच्छ करण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा. फुले, शाहू, आंबेडकरांनीही समाजसुधारणा केली आहे. त्यात ब्राह्मणांचाही वाटा मोठा आहे. मात्र, जाती संपविण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र आले पाहिजे,’ असे आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी रविवारी केले.

‘जात संपविण्यासाठी मी पंधरा वर्षे व्याख्याने देत आहे. मी ब्राह्मण असलो, तरी मला जातीचा आपल्याला दुराभिमान नाही. जात संपली पाहिजे; मनुष्य हा धर्म टिकला पाहिजे. जात संपणे अशक्य आहे म्हणून त्यासाठी प्रयत्न करायलाच नको असे म्हणून चालणार नाही,’ याकडे पोंक्षे यांनी लक्ष वेधले. जात संपविण्याच्या कामात कधीतरी यश मिळेल. आपले राज्य, देश कधी तरी जातमुक्त होईल, अशीही अपेक्षा व्यक्त करताना सध्या मी बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास सुरू केला आहे. मला जेवढे सावरकर प्रिय आहेत; तेवढेच आंबेडकरही प्रिय आहेत, असेही ते म्हणाले.

‘आम्ही सारे ब्राह्मण’ पाक्षिक आणि ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ मासिकाच्या वतीने यंदाचा ‘ब्राह्मणभूषण पुरस्कार’ पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ‘इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार’ दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना देण्यात आला. मानपत्र, पुणेरी पगडी आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर मासिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी, पोंक्षे, लांजेकर, व्यवस्थापकीय संचालक संजय ओर्पे उपस्थित होते. शरद पोंक्षे लिखित ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे या वेळी लोकार्पण करण्यात आले.

ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पोंक्षे यांची मुलाखत घेली. त्यामध्ये त्यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखविले. लांजेकर, देशपांडे यांचीही मनोगते झाली. कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. मेधा चिवटे यांनी सूत्रसंचालन केले.

मैत्रिणीचा मृत्यू अन् हाउसफुल प्रयोग…

‘नथुराम बोलतोय…’ या नाटकाचा भरत नाट्य मंदिरात प्रयोग होता. त्याच दिवशी जीवलग मैत्रीण आणि अभिनेत्री अश्विनी एकबोटे हिच्या नृत्याचाही कार्यक्रम तेथेच होता. तिच्या आग्रहाखातर मी ते नृत्य पहायला गेलो. दरम्यान, आम्ही एकमेकांशी गप्पा मारल्या आणि पुन्हा ती नृत्यासाठी रंगमंचावर गेली आणि तिथेच ती कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात नेले. काही वेळातच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. अश्विनी माझी अगदी जवळची मैत्रीण होती. तिच्या मृत्यूनंतर माझा लगेच साडेनऊ वाजता ‘भरत’ला प्रयोग होता. हा प्रयोग हाऊसफुल होता. तो रद्द करण्याचे निर्मात्यांनी ठरविले. मी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच अवस्थेत ‘नथुराम’चे कपडे चढविले आणि रंगमंचावर उभा राहिलो,’ अशी वेगळी आठवण शरद पोंक्षे यांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button