ठेकेदाराने पैसे दिले नाहीत म्हणून दोघांवर केला जीवघेणा हल्ला; हल्लेखोर कामगारास अटक
पिंपरी l प्रतिनिधी
ठेकेदाराने कामगाराला पैसे दिले नाहीत. या कारणावरून कामगाराने ठरकेदारासोबत हुज्जत घातली. कामगाराला समजावत असताना त्याने समाजवणा-या आणि भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गायकवाड नगर, हिंजवडी येथील सोमाणी ड्रीम होम लेबर कॅम्प येथे घडली. पोलिसांनी आरोपी कामगाराला अटक केली आहे.
अशोक प्रेमलाल बारमण (वय 40, रा. गायकवाड नगर,पुनावळे) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. सरजू बली यादव (वय 28, रा. गायकवाड नगर, पुनावळे. मूळ रा. छत्तीसगड), राजेश्वर साकत अशी जखमींची नावे आहेत. सरजू यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक हा गायकवाड नगर, पुनावळे येथील सोमाणी ड्रीम होम या बांधकाम साईटवर काम करत होता. त्याच साईटच्या लेबर कॅम्पमध्ये तो राहण्यास आहे. त्याला गावी जायचे असल्याने त्याने ठेकेदार तय्यापा पुजारी यांच्याकडे पैसे मागितले. पुजारी यांनी अशोकला पैसे दिले नाहीत. त्यावरून त्याने ठेकेदार पुजारी यांच्यासोबत हुज्जत घातली आणि धक्काबुक्की करून लेबर कॅम्पमध्ये आला.
लेबर कॅम्पमध्ये फिर्यादी सरजू त्याला समजावत होते. त्यावेळी अशोक याने सरजू यांना शिवीगाळ करून कोयत्याने हातावर मारून जखमी केले. त्यावेळी राजेश्वर साकत भांडण सोडविण्यासाठी आले असता अशोक याने राजेश्वर यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अशोकला अटक केली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.