TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

भाजपच्या मिशन बारामतीला मित्रपक्षाचाच सुरुंग, जानकर सुप्रिया सुळेंविरुद्ध रिंगणात उतरणार

बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर रिंगणात

रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांचं वक्तव्य, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टक्कर देणार

बारामती । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भाजपच्या बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी मिशन बारामतीला मित्रपक्षाकडूनच सुरुंग लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवल्याचं दिसतंय. रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी इंदापूरमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्यात तसे संकेत दिले.

शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना जानकर टक्कर देणार असल्याचं चित्र आहे. जानकर हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आहेत.

रासपचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव रासपच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेला महादेव जानकर यांना उमेदवारी देऊन उभं करणार आहोत. कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि संघटनेच्या जोरावर महादेव जानकर यांना बारामतीतून १०० टक्के निवडून आणणार, असा निर्धार रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी व्यक्त केला.

याआधीही, महादेव जानकर यांनी रासपचा मुख्यमंत्री कसा होईल याकडे आपण लक्ष देत असल्याचं म्हटलं होतं. माझ्या पक्षाचे आमदार कसे वाढतील आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री कसा होईल, यासाठी माझा प्लॅन चाललेला आहे. सध्या विधानसभेवर परभणीतील गंगाखेड मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे, तर विधानपरिषदेवर खुद्द जानकर असे पक्षाचे दोनच आमदार आहेत.

कोण आहेत महादेव जानकर?
राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना २००३ मध्ये झाली होती. महादेव जानकर हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महादेव जानकर हे १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून बसपाचे उमेदवार होते आणि त्यांना अंदाजे २० हजार मते मिळाली होती.

२००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रासपने ३८ उमेदवार उभे केले होते. त्यांना एकूण १ लाख ४४ हजार ७५८ मतं मिळाली होती. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्रात १२ आणि कर्नाटकात एक उमेदवार उभा केला होता. २००९ च्या लोकसभेला त्यांनी महाराष्ट्रात २९, तर गुजरात, आसाम आणि कर्नाटकातही उमेदवार दिले होते. माढा लोकसभा मतदारसंघातून जानकर स्वतः शरद पवार यांच्याविरोधात उभे ठाकले होते, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला.

राष्ट्रीय समाज पक्ष जानेवारी २०१९ मध्ये NDA मध्ये सामील झाला. २०१४ च्या निवडणुकीदरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाने भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासोबत महायुती केली होती. त्यांनी महाराष्ट्रात सहा जागा लढवल्या, त्यापैकी केवळ राहुल कुल विजयी झाले. कुल यांनीही रासपला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती घेतला. महायुती सरकारच्या काळात त्यांनी पशुविकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्रिपद भूषवले होते.

भाजपचे मिशन बारामती
भाजपने पवारांचा गड असलेला बारामती खालसा करण्यासाठी चंग बांधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपनं मिशन २०२४ हाती घेतलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या १४१ जागांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. या जागा जिंकण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे बारामतीची जबाबदारी आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बारामती दौराही केला. त्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौरा करुन पवारांना आव्हान देण्याची भाषा केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button