breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मोदींच्या दीर्घायुष्यासाठी भाजपचा महामृत्युंजय जप

नवी दिल्ली |

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सुरक्षेतील त्रुटीं’प्रकरणी भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच असताना भाजपच्या नेत्यांनी गुरुवारी देशभर मोदींच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय जप केला़  दिल्ली, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत असे विधी आयोजित करून भाजप नेत्यांनी मोदींच्या दीर्घायुष्याची कामना केली. पंजाबमधील भटिंडाहून फिरोजपूर येथे जाताना पुलावर आंदोलकांनी बुधवारी ताफा रोखल्याने मोदी १५-२० मिनिटे अडकून पडले होते. पंजाब पोलिसांकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याने मोदींचा ताफा पुन्हा भटिंडा विमानतळावर परतल्याचा आरोप केंद्राने केला़  मोदींना शारीरिक इजा करण्याचे काँग्रेसचे कारस्थान असल्याचा आरोप भाजपने केला असला तरी, मोदींच्या जीवाला धोका नव्हता व सुरक्षेतही त्रुटी नव्हती, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी केला आहे.

या घटनेचे तीव्र पडसाद भाजपमध्ये गुरुवारी उमटले. पक्षाने मोदींच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय जप करण्याचे ठरवले. प्रदेश भाजपमधील नेत्यांना महामृत्यूंजय जपाचे आयोजन करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. त्यानुसार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी भोपाळमध्ये गुफा मंदिरात महामृत्युंजय जप केला. राज्यभरातील मोठय़ा शिवमंदिरात हा जप केला जाणार असून, दोन ज्योतिर्लिग महाकालेश्वर व ओमकारेश्वर येथेही महामृत्जुंय जप केला जाणार आहे.

दिल्लीतही ठिकठिकाणी मंत्रपठण करण्यात आले. झेंडेवाला माता मंदिरात भाजपचे नेते जय पांडा, प्रीत विहारमधील दुर्गा मंदिरामध्ये पक्षाचे महासचिव अरुण सिंह, कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात महासचिव दुष्यंत गौतम आदी नेत्यांनीही मंत्रपठनाचे आयोजन केल्याची माहिती भाजपच्या माध्यम विभागाने दिली़  त्रिपुराची राजधानी अगरतळामध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री बिप्लब देव हेही धार्मिक विधीमध्ये सहभागी होणार आहेत. मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये कालभैरव मंदिरातही महामृत्युंजय जप करण्यात येणार आहे.

  • काँग्रेसला माफ करू नका-राजनाथ सिंह

लोकशाही व्यवस्थेमध्ये पंतप्रधान ही केवळ व्यक्ती नसते तर, संस्था असते. ही संस्था कमकुवत होणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिली. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींबद्दल अनुद्गार काढले. मतदारांनी काँग्रेसला माफ करू नये, असे आवाहन राजनाथ यांनी उत्तराखंडमधील जाहीर सभेत केले.

  • पंतप्रधान- राष्ट्रपती भेट

पंजाबमधील घटनेची सविस्तर माहिती देण्यासाठी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. सुरक्षेतील त्रुटीबद्दल कोविंद यांनी चिंता व्यक्त केली. या भेटींनंतर मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही घेतली.

  • आज सुनावणी

पंतप्रधानांच्या ‘सुरक्षेतील त्रुटीं’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आह़े  त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आह़े सर्वाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सुरक्षेतील त्रुटीसंदर्भात योग्य पावले उचलली जातील, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button