breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव!;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला

मुंबई: मुंबईला स्वतंत्र करण्याच्या भाजप नेत्यांच्या भाषेमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव उघड झाला आहे. मात्र तसा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा इशारा देत भाजपच्या विकृत-विखारी हिंदुत्वामुळे देशाची दुर्दशा झाल्याची टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली. त्याचबरोबर आता शिवसेना मैदानात उतरत असल्याचे सांगत राजकीय लढाईचे रणशिंग फुंकले.

शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास दया माया न दाखवता पळता भुई थोडी करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना दिला. तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र बसू आणि लोकांच्या हिताची कामे करू, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईला स्वतंत्र करण्याची भाषा केली. पोटात असलेले ओठांवर आले असून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा त्यांचा मनसुबा उघड झाला आहे. पण तुमच्या मालकांसह १७ पिढ्या खाली आल्या तरी मुंबई मराठी माणसाचीच राहील, ती महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

भाजपचे हिंदुत्व विकृत असून ते आम्हाला मान्य नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार दिला. पण भाजप हिंदुत्वाचा विखार पसरवत आहे. या हिंदुत्त्वातून देशाला दिशा काय देणार? त्यातून देशाची दुर्दशा होत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हिंदुत्वासाठी तुम्ही काय केले, याचे दाखले समोर ठेवा, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी दिले.

ते देश पेटवणारे, तर आम्ही चूल पेटवणारे आहोत. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे धोरण आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाजपचे हिंदुत्ववादी खालच्या पातळीची, विखारी भाषा करतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल गलिच्छ विचार त्यांनी व्यक्त केले. हेच का भाजपचे, संघाचे, भाजपप्रणित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार, असा सवाल ठाकरे यांनी केला. संस्कार, संस्कृती आणि सुसंस्कृतपणा संपला तर हिंदुत्व कसले, असेही त्यांनी सुनावले.

महागाई, बेरोजगारी आणि काश्मीरमधील दहशतवादावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. काश्मीरमध्ये राहुल भटला जिथे मारले तिथे काय हनुमान चालिसा म्हणायची? हे काश्मार फाईलचे पुढचे पाऊल आहे काय? असा सवाल त्यांनी केला. भाजपचे हे हिंदुत्त्व म्हणजे भ्रमिष्ट करण्याचे हिंदुत्त्व असल्याची टीकाही त्यांनी केली.

वाढलेले गॅसदर आणि गेल्या पाच वर्षांत दोन कोटी लोकांनी रोजगार गमावल्याच्या मुद्यांकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. केंद्रीय यंत्रणाची भीती दाखवून लोकांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो, असा आरोप त्यांनी केला. सध्याची परिस्थिती लक्षात घेता आता हे दाऊदच्या मागे लागले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करतो, असे दाऊद म्हणाला तर तो केंद्रात मंत्री म्हणूनही दिसेल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी भाजपला हाणला.

महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न

महाराष्ट्राला बदनाम करण्याचे भाजपचे प्रयत्न बघून उद्वेग येतो. सुशांतसिंग प्रकरणापासून आतापर्यंत जे आरोप केले त्याचे पुढे काय झाले? आम्ही कधी तुमच्या कुटुंबाची निंदानालस्ती केली नाही. पण सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. एकतर्फी प्रेमातून जसा तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून तिला विद्रुप केले जाते, तशाच प्रकारे महाराष्ट्रालाही विद्रुप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा १५ जूनला

१० जूनला राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होत असल्याने त्या दिवशी आयोजित केलेला आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. आता हा दौरा १५ जून रोजी होईल, असे त्यांनी जाहीर केले.

सभा घेताय तर महागाईवर बोला..

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज, रविवारी गोरेगाव येथील सभागृहात सभा घेतली आहे. त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, उद्या त्यांची सभा आहे, मग आम्ही परवा सभा घ्यायची का? हे असेच चालू ठेवायचे का? उद्या सभा आहे तर महागाईवर बोला, असा खोचक सल्लाही ठाकरे यांनी फडणवीस यांना दिला.

ठाकरे यांचे फटकारे

रवी राणा, नवनीत राणा, किरीट सोमय्या आणि ओवेसी यांच्यावर टीका करताना, भाजपची अ, ब, क टीम कोणाच्या हाती भोंगा द्यायचा. कुणाला औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचे, हनुमान चालिसा बोलायला लावायचे आणि हे टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषदा घेणार.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समितीतून सर्वात प्रथम जनसंघवाले फुटले. शिवसेनेची पंचवीस वर्षे युतीमध्ये सडली. त्यानंतर यांचा हिंदुत्वाचा बुरखा फाटला आणि यांचा भेसूर चेहरा सर्वाना दिसला. आम्ही काँग्रेससोबत जाऊनही हातातला भगवा सोडला नाही. आम्ही जे केले ते उघडपणे केले. पण तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात नव्हे तर भाजपवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते.

विरोधकांनी केंद्रात जाऊन ओरडावे..

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्राला नको असताना मुंबईत जमीन पाहिजे असा आग्रह धरतात. मात्र मुंबई महानगर प्रदेशासाठी महत्त्वाच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी कांजुर मार्गची जागा केंद्र सरकार देत नाही. पैसे घेऊनही धारावी प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन देत नाहीत. महाराष्ट्रात ओरडणाऱ्या विरोधकांनी यासाठी केंद्रात जाऊन ओरडावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button