breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल”; शरद पवारांचा हल्लाबोल

मुंबई |

महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेससचे सर्वेसर्वा शरद पवार पहिल्यांदाच उघडपणे बोलले आहेत. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग बेपत्ता झाल्याचे त्यांनी सांगितले. अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यापासून ते बेपत्ता आहेत. आता ते आरोप सिद्ध करण्यासाठी पुढे येत नाहीत. भाजपावर हल्लाबोल करताना अनिल देशमुख यांना तुम्ही तुरुंगात टाकले, परमबीर सिंग फरार आहेत. तुम्ही जे काही केले असेल त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल असे शरद पवारांनी म्हटले आहे. शरद पवारांनी पहिल्यांदाच अनिल देशमुखांची उघडपणे बाजू मांडली. अनिल देशमुख यांच्यासोबत जे झाले तो अन्याय आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुखांना चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. दरम्यान, विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी अनिल देशमुख प्रकरणावरुन भाजपावर जोरदार टीका केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लहान-थोर कार्यकर्ता त्याचा विचार कधीच सोडणार नाही आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजासकट या लोकांना अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्त गेल्यावर असं घडतं,” असे शरद पवार यांनी म्हटले. “राज्यातील सरकार आपल्या हातून गेलं म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे हे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. तुम्ही कितीही छापे मारा आज ना उद्या ही सगळी शक्ती सामान्य माणसांचा पाठिंबा घेऊन कधीही तुम्हाला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही,” असे शरद पवार म्हणाले.

“दोषारोप होताच अनिल देशमुख माझ्याकडे आले आणि दोष लागल्यामुळे मी सत्तेत बसणार नाही हा निर्णय घेतला व त्यांनी राजीनामा दिला. हे कशामुळे घडले तर एका माजी आयुक्तांमुळे घडले. आता हे आयुक्त आहेत कुठे? तुम्हाला तोंड दाखवायची ज्यांची तयारी नाही असे अधिकारी बाहेर आहेत आणि अनिल देशमूख आत आहेत,” असे पवार म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात भाजपाच्या पर्यायाबाबत सांगितले. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न नसल्याचे ते म्हणाले. त्याऐवजी भाजपाला घेरण्यासाठी जनतेच्या अपेक्षेनुसार नेतृत्व दिले जावे, हीच चिंतेची बाब आहे. अमरावतीमध्ये नुकताच झालेला हिंसाचार दुर्दैवी असल्याचे सांगून पवार म्हणाले की, अशा घटनांमध्ये नुकसान झालेल्या व्यापारी आणि दुकानदारांचे नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने धोरण आखले पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button