भाजप खासदार बृजभूषण सिंह राज ठाकरे यांचं अयोध्येत स्वागत करणार!
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही चांगले नेते आहेत
अयोध्या : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उंदीर आहेत. त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना अयोध्येच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही. मग मिलिट्री आली तरी बेहत्तर, असं भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता. मात्र आता बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंचं अयोध्येत स्वागत आहे असं म्हटलं आहे.
बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, राज ठाकरे यांचे अयोध्येत जल्लोषात स्वागत होणार. आमचे त्यांच्याशी मतभेद नाहीत. अयोध्येत न येता राज ठाकरेंनी माझा सन्मान केला आता त्यांचे अयोध्येत जल्लोषात स्वागत होणार आहे. आमचे महाराष्ट्रातील नेत्यांशी खूप चांगले संबंध आहेत. आम्ही कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून विरोध केलेला नाही.
बृजभूषण सिंह यांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याविषयी विचारण्यात आलं त्यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही चांगले नेते आहेत. या दोघांशीही माझे चांगले संबंध आहेत.