breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजप आमदार गणेश नाईकांवर गुन्हा दाखल; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

मुंबई |

ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी मार्च २०२१मध्ये रिव्हाॅल्वर दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप एका महिलेने केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री सीबीडी पोलिस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्यासह १५ वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी गणेश नाईक यांनी दिली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांपासून आमच्या जीवाला धोका आहे, अशी लेखी तक्रार काही दिवसांपूर्वी याच महिलेने नेरूळ पोलिस ठाण्यात केली होती. त्यावेळेस नेरूळ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून महिलेला २४ तास पोलिस संरक्षण दिले. राज्याच्या महिला आयोगाकडेदेखील संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिला आयोगाकडूनही नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना या प्रकरणी चौकशी करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते. गणेश नाईक आणि मी सन १९९३पासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असून मला त्यांच्यापासून एक १५ वर्षांचा मुलगा आहे, असे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

आमदारांचे राज्यात चांगलेच वजन असल्यामुळे अनेक वर्षे मला काहीच करता आले नव्हते. परंतु, आता माझा मुलगा मोठा झाला असून त्याच्या भविष्यासाठी त्यालादेखील त्यांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा मिळावा, असा आग्रह महिलेने पोलिस व महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत धरला आहे. या प्रकरणावरून विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनीदेखील नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून आमदार गणेश नाईक यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन डीएनए चाचणी करून खऱ्या-खोट्याचा उलगडा करावा, असे म्हटले होते.

मार्च २०२१मध्ये आमदार गणेश नाईक यांनी मला सीबीडी रेतीबंदर येथील लखानी टॉवर्ससमोरील इमारतीत बोलावून घेतले. तेथे मी माझ्या मुलाला त्यांचे नाव देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी माझ्यासमोर बंदूक ठेवून मला त्रास देऊ नको, असे सांगत तू शांत राहिली नाहीस, तर मी स्वतःलाही संपवेन आणि तुम्हा दोघांनाही संपवेन, अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला, अशी माहिती सीबीडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. यासंदर्भात गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button