breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वेतनवाढीच्या प्रस्तावानंतरही तिढा कायम! कर्मचारी संघटना विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम; आज निर्णय

मुंबई |

एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी बुधवारी केली. शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. मात्र, या निर्णयानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. संप मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटना आज, गुरुवारी निर्णय जाहीर करणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रकरणी सह्याद्री अतिथीगृह येथे अनिल परब, एसटीचे अधिकारी, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत व एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर मूळ वेतनात वाढ करण्याचे परब यांनी जाहीर केले. विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना साधारण ४१ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात येणार आहे. एसटीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे परब यांनी सांगितले. याशिवाय वेळेवर वेतन, प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासनही शासनाने दिले. यामुळे महिन्याला ६० कोटी रुपये अतिरिक्त बोजा पडेल. करोनाकाळात एसटीचे प्रचंड नुकसान झाले असून, या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाने २ हजार ७०० कोटी रुपये मदत केल्याचे परब यांनी सांगितले.

वेतनवाढीच्या निर्णयानेही एसटी कर्मचारी संघटनांचे समाधान झालेले नाही. या संघटना विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या निर्णयाबाबत चर्चा करून गुरुवारी संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले.

  • …तरच निलंबन कारवाई रद्द

निलंबित केलेले संपकरी कर्मचारी कामावर हजर झाल्यास निलंबन रद्द केले जाईल. ते हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामावर हजर व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

  • संप मागे न घेतल्यास कारवाई

विलीनीकरणाबाबत शासनाने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर शासनाने नेमलेली समिती निर्णय घेईल. समितीचा अहवाल १२ आठवडय़ांत मिळणार असून, हा संप तोपर्यंत सुरू राहू नये, यासाठी वेतनवाढीचा निर्णय घेतला. संपामुळे होणारे नुकसान एसटीला व कामगारांनाही परवडणारे नाही. संप मागे घेतला नाही तर कठोर कारवाई करण्याचा इशाराही परब यांनी दिला.

  • पगारवाढ अशी…

* एक ते दहा वर्षे सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपये वाढ होईल. त्यानुसार ज्यांचे मूळ वेतन १२ हजार ८० रुपये होते ते आता १७ हजारांहून अधिक होईल. इतर भत्त्यांसह त्यांच्या एकूण वेतनात ७ हजार २०० रुपये वाढ होणार असून, त्यांचे पूर्ण वेतन १७ हजार ८० रुपयांवरून २४ हजार ५०० रुपये होईल.

* दहा ते २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी ४ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १६ हजार रुपये असलेले मूळ वेतन २३ हजार ४० रुपये होईल. इतर भत्त्यांसह त्यांच्या एकूण वेतनात ५ हजार ७६० रुपये वाढ होत असून, पूर्ण वेतन २८ हजार ८०० रुपयांपर्यंत जाईल.

* वीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी २,५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यांसह त्यांच्या एकूण वेतनामध्ये ३,६०० रुपये वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांचे पूर्ण वेतन ३७ हजारांवरून साधारण ४१ हजार रुपये होईल.

* तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी २,५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. इतर भत्त्यांसह त्यांच्या एकूण वेतनामध्ये ३,६०० रुपये वाढ होईल. त्यामुळे त्यांचे पूर्ण वेतन साधारण ५६ हजार रुपये होणार आहे.

  • घोषणा काय?

’ प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन.

’ प्रवासी व उत्पन्नवाढीसाठी चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता.

’ संपकाळात हजर चालक, वाहकांना हजर दिवसाचे वेतन.

’ आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांबाबत शासन सहानुभूतिपूर्वक विचार करेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button