breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीलेख

वाढदिवस विशेष : आयुक्त शेखर सिंह साहेब, पिंपरी-चिंचवडच्या विकास अश्वरथाचे ‘सारथी’ व्हा!

श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीच्या सानिध्यात वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या प्रगतीमध्ये अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे योगदान आहे. त्यामध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करणारे श्री. हरनाम सिंह यांच्यापासून श्री. दिलीप बंड, श्री. आशिष शर्मा आणि श्री. श्रावण हर्डीकर यांची कारकीर्द लक्षवेधीच म्हणावी लागेल. अल्पकाळासाठी रुजू झालेले श्री. श्रीकर परदेशी यांनी आपला कार्यकाळ गाजवला. मात्र, अनधिकृत बांधकामांच्या मुद्यांवर परदेशी टिकेचे आणि नाराजीचे धनी ठरले, हे नाकारता येणार नाही. यामध्ये अनेकांनी आपआपल्या परीने योगदान दिले. आजच्या घडीला श्री. शेखर सिंह शहराचे ‘कारभारी’ आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडकरांच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा केलेला हा प्रयत्न…

गावकुस बदलून कामगार नगरी, उद्योग नगरी, बेस्ट सिटी, आयटी हब, स्मार्ट सिटी अशी दमदार वाटचाल करणारे शहर आता स्पोर्ट्स सिटी, एज्युकेशन हबच्या दिशेने झेपावत आहे. या विकास अश्वरथाचे ‘सारथी’ म्हणून सध्या आयुक्त व प्रशासक शेखर सिंह धुरा सांभाळत आहेत. प्रशासक या नात्याने शहराचे पालकत्व त्यांच्याकडेच आहे.

‘सारथी’   कोण असतो, तर महाभारताच्या काळापासून तो दिशादर्शक, मार्गदर्शक आणि योग- अयोग्य, धर्म-अधर्माची जाणीव करुन देणार असतो, अशीच आमची धारणा आहे. मग, आजच्या घडीला आम्हा पिंपरी-चिंचवडकरांचे ‘सारथी’ शेखर साहेब आपण आहात. प्रचंड राजकीय उलथापालथ होत असताना आपल्याला न्याय्य भूमिका घेत शहराच्या हिताचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.

जगद्गुरु संत तुकाराम, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पदस्पर्शांनी पावन झालेल्या भूमित आपण आज ‘पालकत्वाची’ भूमिका साकारत आहेत. त्यामध्ये सोसायटीधारकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपासून, कष्टकरी-कामगारांपर्यंत सर्वांना चांगली जीवनशैली आणि पायाभूत सुविधा देण्याचे ‘शिवधनुष्य’ आपल्याला पेलावे लागणार आहे.

श्री. सिंह २०१६ च्या बॅचचे अधिकारी असून, देश पातळीवर त्यांनी ३०६ वा क्रमांक पटकावला होता. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सिंह यांची २०१८ मध्ये गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली होती. तेथील प्रशासकीय कार्यकाल पूर्ण झाल्यावर शेखर सिंग यांच्याकडे सातारा जिल्हयाची जिल्हाधिकारी या नात्याने जवाबदारी आली होती.

विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार  यांच्याकडून कौतुकाची थाप मिळालेले सिंह यांना आता विद्यमान मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली ‘प्रशासक’ म्हणून कामाचा ठसा उमटवावा लागेल.

शहरी आणि ग्रामीण भागातील कामाचा अनुभव असलेले शेखर सिंह पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावतील, अशी अपेक्षा आहे. शहरातील प्रमुख समस्या जसे की, कचरा, पाणी, नागरी आरोग्य, पर्यावरण आणि महत्त्वाचे म्हणजे अतिक्रमण या सर्वच बाबींवर शेखर सिंह यांना काम करावे लागणार आहे. करदाता पिंपरी-चिंचवडकर त्याच अपेक्षेने सिंह यांच्या कार्यपद्धतीबाबत उत्सूक आहे. आम्हा पिंपरी-चिंचवडकरांना चांगली जीवनशैली आणि सक्षम पायाभूत सोयी-सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहात… याकडे लक्ष वेधणे क्रमप्राप्त आहे.

आता प्रशासकीय राजवट आणि सत्ता समीकरण या संघर्षात श्री. सिंह यांना आपले प्रशासकीय कौशल्य दाखवावे लागणार असून, सत्ताधारी राज्य सरकार, विरोधी पक्ष यांच्या अपेक्षांचा ताळमेळ घालून शहराच्या विकासाचा अश्वरथ यशस्वी ‘सारथी’ म्हणून हाकावा लागणार आहे.

‘टॉपर’ असलेले आणि सर्वोत्कृष्ठ किताब पटकावणारे श्री. शेखर सिंह पिंपरी-चिंचवडकरांच्या अपेक्षांना खरे उतरतील, हीच त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा…!

आपला स्नेहांकीत,

पिंपरी-चिंचवडकर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button