ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील वाहनचालकांसाठी मोठी बातमी; पोलिसांकडून शहरात आज विशेष मोहीम

मुंबई | मुंबईतील वाढती वाहनसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारे ध्वनिप्रदूषण याची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जात असतानाच मुंबई पोलिसांनी जनजागृतीसाठी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. आज, शनिवारी ‘भोंगाबंदी’ हा उपक्रम राबविला जात असून चालकांनी दोन तास गाड्यांच्या भोग्यांचा अजिबात वापर न करता ध्वनिप्रदूषण कमी करण्याच्या मोहिमेत सहकार्य करावे असे, आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुंबई पोलिस आयुक्तांनी व्हॉट्सअॅपद्वारे तक्रारीसाठी मोबाइल क्रमांक दिल्यानंतर मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी या वाहतूककोंडी आणि ध्वनिप्रदूषणाच्या असतात. रात्री उशिरापर्यंत स्पीकरचा आवाज, बांधकाम सुरू आणि विनाकारण हॉर्न वाजविले जात आहेत अशा स्वरूपाच्या या तक्रारींचा समावेश असल्याने मुंबई पोलिसांनी उशिरापर्यंत बांधकाम सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. न्यायालयाने दिलेली वेळेची मर्यादा न पाळणारे कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिकांनंतर पोलिसांनी आपला मोर्चा विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांकडे वळविला. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरीही हॉर्न वाजविणे सुरूच असून यासाठी कारवाई बरोबरच जनजागृतीची गरज असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी दोन तास ‘भोंगाबंदी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. शनिवारी सायंकाळी ५ ते ७ वाजता या दोन तासांच्या कालावधीत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी हॉर्नचा वापर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संपूर्ण मुंबईत हा उपक्रम हाती घेण्यात येत असून यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होईल आणि विनाकारण हॉर्न वाजविणारे कमी होतील, असे पोलिसांनी म्हटले आहे.

१३ हजार चालकांवर बडगा

मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या १३ हजारांपेक्षा अधिक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. सायलेन्सर मध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ३०० पेक्षा अधिक वाहनचालकांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button