breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोठी बातमी! सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन

मुंबई |

सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली. तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. सभागृहात हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोधी पक्षाचा सभागृहातील संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सभागृहातून भाजपा आमदारांचं निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. “विरोधी पक्षांच्या नेत्यांना मी विनंती केली की, आपण बोलताहात तर आपल्या सदस्यांना बसायला सांगा. विरोधीपक्ष नेते हळू आवाजात बोलले, पण त्यांचा माईक सुरु होता. नाही, नाही बसायचं नाही. माझं पूर्ण लक्ष होतं. ठिक आहे, उभे राहिले. त्यानंतर विरोधीपक्षाने त्यावर सर्व मुद्दे मांडले. तेव्हा सभागृहात शांतता होती. त्यावेळी मी त्यांना सांगितलं, आपण किती बोलताहेत तेवढं बोला. मात्र सरकार जेव्हा आपली बाजू मांडेल तेव्हा शांत राहण्याचं मला वचन द्या. त्यावर विरोधीपक्षाने सांगितलं ते मेरिटवर बोलत असतील, तर आम्ही ऐकू. विरोधी पक्षनेत्यांचं भाषण पूर्ण झालं. कुठेही आडकाठी नाही. त्यावर छगन भुजबळ यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यांना मी थांबवलं आणि सांगितलं. पहिल्यांदा प्रस्ताव वाचा. मग त्यावर भाष्य करा. मग भुजबळांनी प्रस्ताव वाचला. भुजबळांनी विरोधीपक्षाच्या एकाएका मुद्द्याचं स्पष्टीकरण पुराव्यानिशी दिलं. त्यावर विरोधी पक्षाला काही मुद्दे उपस्थित करायचे होते. ते उभे राहिले. गेली ३६ वर्षे सभागृहात मी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी असं घडलेलं नाही. मी स्वत: आक्रमक आहे. रोखठोक आहे. मला खोटं बोलायला आवडत नाही. सत्ताधारी पक्षानं दिलेलं उत्तर विरोधीपक्षाला मान्य नसतं. यावेळी व्यासपीठावर काही सदस्य आले. आणि माझ्या समोरचा माईक ओढण्याचा प्रयत्न केला. राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. ताणतणाव झाला की, सभागृहाचं काम दहा पंधरा मिनिटाकरिता तहकूब केलं जातं.” असं तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितलं.

“अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख बसतात. त्याच्यावर तोडगा काढतात. एकदा सभागृहाच्या बाहेर गेल्यावर मी व्यक्तिगत कुणाशीही कटुता ठेवलेली नाही. प्रत्येकाशी भेटतो आणि बोलतो. मी केवळ अधिवेशन चालविण्याकरीता तालिका अध्यक्ष आहे. मी दालनात बसलेलो असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ते रागात आले. ते इथेच चिडलेले होते. मी त्यांना बोललो या बसा. ते रागवलेले होते. चंद्रकांत दादा आले. मी त्यांना माझ्या बाजूच्या खुर्चीत बसवलं. इतर सदस्यांनाही मी बसण्याची विनंती केली. मी त्यांना बोललो यातून मार्ग काढू. मात्र विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळी या बाजूच्या अनेक सदस्य आतमध्ये आले. त्यांनी माझ्या आई बहिणीवरुन शिव्या देऊ लागले. घुसले तर घुसले, काही सदस्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. जसे गावगुंड असतात. तसे लोकप्रतिनिधी अंगावर आले. मी त्यांना सांगत होतो याना आवरा. पण त्यांना आवरत नव्हते. तुम्ही ५०-६० जण आले तर मी एकटा आहे. मी मागे हटणार नाही. मी मागे हटलो नाही. ही स्थिती महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे.” असंही तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button