breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

BIG NEWS: पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक : अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांना राष्ट्रवादीकडून कायदेशीर कारवाईचा इशारा

प्रचार साहित्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापरले

राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार आण्णा बनसोडे यांचा गर्भीत इशारा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अपक्ष उमेदवार नीता संजय ढमाले प्रचार साहित्यामध्ये महाविकास आघाडीतील (शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस) नेत्यांचे फोटो वापरुन मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाप्रकारे बेकायदेशीरपणे फोटोंचा वापर करु नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातून रितसर प्रत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, विधान परिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघामधून ज्योती श्रीनिवास ढमाले ( सौ. नीता संजय ढमाले) या नावाने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवार बेकायदेशीररीत्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची छायाचित्रे आणि त्यांच्या नावाचा वापर आपल्या प्रचारासाठी करत आहेत. महाविकास आघाडीकडून पुणे पदवीधर मतदार संघासाठीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. अरूण गणपती लाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार त्यांनी पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठी ‘एए’, ‘बीबी, फॉर्मस् निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे वेळेत दाखल केलेले आहेत व श्री. लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वैधरीत्या नामनिर्देशित झालेले उमेदवार आहेत.

मात्र, ढमाले या अपक्ष उमेदवार महाविकास आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला नुकसान व्हावे यासाठी जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर करत आहेत. महाविकास आघाडीतर्फे ढमाले यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली नाही वा त्यांना पाठिंबाही दिलेला नाही. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, मा. खा. सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. ना. बाळासाहेब थोरात यांचे आपल्या प्रचार साहित्यामध्ये फोटो टाकून ढमाले या त्यांच्या नावाचा अनधिकृतपणे वापर करून मतदारांची दिशाभूल करत आहेत. ढमाले यांनी या बेकायदेशीर बाबींचा प्रचार साहित्य म्हणून वापर न थांबवल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर करवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षातर्फे तसे पत्र ज्योती ढमाले यांना पाठवले आहे.

पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांना गर्भीत इशारा…?

दरम्यान, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथील मेळाव्यात दोघांनाही कानपिचक्या दिल्या होत्या. आता अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांनी प्रचार साहित्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बेकायदापणे फोटो वापरले आहेत. त्याची दखल थेट राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवर घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आमदार आण्णा बनसोडे आद्यापही ढमाले यांच्या प्रचारात व्यस्त आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच, सदर पत्राची प्रत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, पुणे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आली आहे. निता ढमाले यांना दिलेला कारवाईचा इशारा म्हणजे आमदार आण्णा बनसोडे यांना दिलेला गर्भीत इशारा आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button