breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची पैठणमध्ये विराट सभा

विरोधकांवर टोलेबाजी आणि आश्वासनांची खैरात

पैठण । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज औरंगाबाद येथील पैठण येथे विराट सभा झाली. या सभेसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे देऊन माणसं आणली असल्याची टीका सकाळपासूनच विरोधकांकडून सुरू होती. मात्र, सभेला झालेली विराट गर्दी पाहून ही माणसं पैसे देऊन आले असतील का असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही, प्रेमाने आलेली गर्दी आहे. सकाळी ११ वाजल्यापासून येथे माताभगिनी बसल्या आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही गर्दी आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकूणच मुख्यमंत्र्यांची ही सभा पैठणीसारखी भारी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर होतेे. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केलं.

याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, बालाजी कल्याणकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने , महावितरणचे डॉ. मंगेश गोंदावले, लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे आतापर्यंत तीनवेळा औरंगाबादेत आले आहेत. आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, रमेश बोरनारे, संदिपान भूमरे हे शिंदे गटातील आमदार आहेत. त्यांनी औरंगाबादेत सभा घेण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याकरता शिंदे गटातील सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पैठणच्या सभेत तुफान गर्दी जमली होती. या गर्दीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टोलेबाजी केली.

पैठणीसाठी क्लस्टर उभारणार
पैठणची पैठणी विश्वप्रसिद्ध आहे. येथील व्यापाराला चांगली चालना मिळण्याकरता लवकरच पैठणीसाठी क्लस्टर उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

आश्वासनांची खैरात
पैठण येथे १०० खाटांची मागणी सरकार मान्य करणार आहे.
अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करणार, सरकराच्या पैशांनी विकसित करणार
पैठणी साडी उत्पादन करण्यासाठी क्लस्टर उभारणार
पैठण संतपीठ प्रस्ताव आणणार आहोत. त्यासाठी २० कोटींची आवश्यकता. वारकऱ्यांना न्याय देण्यासाठी बैठक बोलावणार
शहराचा पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यासाठी पैसे देणार
मराठवाडा वैज्ञानिक मंडळाचा प्रस्ताव पाठवणार
गंगापूर मतदारसंघामध्ये मराठवाडा वॉटरग्रीडसाठी १४०० कोटी मंजूर झाले आहेत

विरोधक औषधालाही उरणार नाहीत
अशी आश्वसानांची जाहीर घोषणा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनाही टोला लगावला. आमचं काम करणारं सरकार आहे. आमच्या कामांमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. मंत्री नागरिकांत फिरायला लागले तर विरोधक औषधालाही उभे राहतील की नाही अशी भिती निर्माण झाली आहे म्हणून ते विरोध करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

विरोधकांच्या शब्दकोषात खोके आणि गद्दारी हे दोनच शब्द उरले आहेत. तुमच्या खोक्यांचा हिशोब आता काढणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनेवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी जाहीर करावी. मुंबईतील मराठी माणूस विरार, बदलापूरपर्यंत का गेला, याचा विचार करायला हवा, रोखठोकमध्ये याचं विश्लेषण करायला हवं. निवडणुकीसाठी केवळ मराठीचा मुद्दा पुढे करायचा, निवडमुकीनंतर मात्र मराठी माणूस देशोधडीला का लागलाय, याचा विचार करायला हवा. आता जसं मुंबईत घराघरात जाताय, तसं आधी केलं असतं तर मुंबईतील टक्का कमी झाला नसता. एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे, तर याच साबणाने तुमची चांगली धुलाई केली हे विसरु नका, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

आधी दादा आता ताई टीका करतायत
आधी दादा टीका करत होते, आता ताईपण सुरू झाल्यात. ते त्यांचं काम करतात. कोणी वंदा, कोणी निंदा टीका करणे हा विरोधकांचा धंदा, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, एक कार्यक्रमात जाण्यासाठी आणि दुसरा मंत्रालयात बसण्यासाठी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या या टीकेवर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

माझ्यातील कार्यकर्ता मरू देणार नाही
मला नागरिकांसोबत अंतर राखायचं नाही. म्हणून मी सर्वांच्या गाठीभेटी घेत असतो. मुख्मयंत्री आपल्यातचलाच आहे. हा सर्वसामान्यातला मुख्यमंत्री आहे, असं नागरिकांना वाटतं. मुख्यमंत्री घरच्या गाठीभेटी घेतात, अशी माझ्यावर टीका होते. पण ती माझी माणसं आहेत, ते प्रेमाने बोलवतात. मी नेहमीच सर्वांच्या घरी जात असतो. कालपर्यंत हा बाबा येत होता, आता हा बाबा बदलला, असं व्हायला नको म्हणून मी आजही सर्वांच्या घरी जातो. माझ्यात कधीच बदल होणार आहे. मी मुख्यमंत्री असलो तरीही मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी माझ्यातील कार्यकर्ता मरू देणार नाही.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादेत तीनवेळा भेटी दिल्या आहेत. गेल्या काही शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद रस्त्यावर आलेले पाहिले आहेत. त्यामुळे या दौऱ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकारता पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. औरंगाबाद ते पैठण आणि पैठण ते पाचोड या मार्गांवर ठिकठिकाणी पोलीस पाईंट उभारण्यात आले होते. तर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण पोलिसांना बंदोबस्तसाठी पैठणमध्ये पाचारण करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button