breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमहाराष्ट्रव्यापार

राज्यातील वाहन खरेदीत मोठी वाढ

मुंबई |

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर एप्रिल व मेच्या तुलनेत जून महिन्यात राज्यातील वाहन खरेदीत वाढ झाली आहे. एप्रिल २०२१ ते जून २०२१ पर्यंत २ लाख २३ हजार ७९६ दुचाकी, चारचाकींसह अन्य नवीन वाहनांची नोंद झाली असून यात जून महिन्यात १ लाख १४ हजार ३४७ वाहनांच्या नोंदीचा समावेश आहे. वाहन खरेदीत वाढ झाल्याने तीन महिन्यांत परिवहन विभागाला एक हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. एप्रिल महिन्यात वाहन नोंदणी ७३,९८४ आणि मे महिन्यात ३५ हजार ४६५ एवढी होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलमध्ये राज्यात टाळेबंदी लागली. यात काही भागांत कठोर अंमलबजावणी झाल्याने वाहन खरेदी थांबली.

जून महिन्यात टाळेबंदी हळूहळू शिथिल होण्यास सुरुवात झाली. करोनाची लाट, त्यात ठिकठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा, गर्दी इत्यादी कारणांमुळे अनेकांनी स्वमालकीचे वाहन घेण्यास पसंती दिली आहे. गेल्या वर्षीही टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर असाच कल दिसून आला होता. गेल्या काही महिन्यांत पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाही अनेकांनी पेट्रोलवरील वाहनांनाच पसंती दिली आहे. त्यामागोमाग डिझेलवरील वाहन खरेदी आहे. तीन महिन्यांत २ लाख २३ हजार ७९६ नवीन वाहनांची नोंद झाली असून यात १ लाख ६६ हजार ३८२ पेट्रोलवरील आणि ३७ हजार १६३ डिझेलवरील वाहने आहेत. शिवाय पर्यावरणपूरक अशा विद्युत वाहनांचीही खरेदी अनेकांनी केली आहे. यात विद्युतवरील २ हजार १९९ वाहने असल्याचे परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले. तसेच सीएनजी, पेट्रोल-सीएनजी, एलपीजी, पेट्रोल-एलपीजी इत्यादी इंधनावरील वाहनांची खरेदी झाली आहे.

  • दुचाकींची खरेदी अधिक

एप्रिल ते जून या तीन महिन्यांत १ लाख ३७ हजार १०३ दुचाकींची, तर ६७,८७४ चारचाकी वाहनांची खरेदी झाली असून उर्वरित वाहनांमध्ये तीनचाकी, अवजड वाहनांसह अन्य वाहने आहेत. यात एप्रिलमध्ये ४५,५०१ दुचाकी, तर जून महिन्यात सर्वाधिक ७४,९८० दुचाकींची खरेदी झाली आहे.

  • पुणे, नाशिक, कल्याणध्ये सर्वाधिक नोंद

मुंबईतील ताडदेव आरटीओत जूनमध्ये २,५६२, अंधेरी आरटीओत १,६८७, वडाळा आरटीओत २,५२४ आणि बोरिवली आरटीओत २,०७५ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. ठाणे आरटीओतही ४,१९७, वाशीत १,१९५, वसई आरटीओत २,१२६ कल्याण ३,२४१, पुणे आरटीओत ९,३६७, नाशिक आरटीओत ४,२५६ वाहनांची नोंदणी झाल्याचे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button