ताज्या घडामोडीमुंबई

आज लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल

मुंबई| दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान दोन एक्स्प्रेस गाड्यांची धडक होऊन अपघात झाला असून या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा उपनगरीय लोकलचा धीमा मार्ग सुरू करण्यात आला असला तरी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात रखडपट्टी झाली. रात्री कामावरून निघालेले अनेक चाकरमानी प्रवासात अडकले. त्याचवेळी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द झाल्याने त्या प्रवाशांनाही मोठा मनस्ताप झाला आहे. ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. रात्री एकच्या सुमारासही हे चित्र कायम होते. दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल आज रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटलेली गदग एक्स्प्रेस आणि दादर येथून सुटलेली चालुक्य एक्स्प्रेस यांच्यात धडक होऊन शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे चालुक्य एक्स्प्रेसचे मागील तीन डब्बे घसरले आहेत. हे डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातग्रस्त गदग आणि चालुक्य एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी माटुंगा स्थानकात आसरा घेतला आहे. यात उपनगरांतील प्रवासी मोठ्या प्रमाणात होते. मुंबईत राहणारे प्रवासी मात्र घरी परतले.

कल्याण, ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी

अपघात झाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव उपनगरीय रेल्वेची जलद व धीम्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या पावणे दहा वाजता बंद करण्यात आल्या व पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. जलद मार्गावरील वाहतूक बंद असल्याने धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या एक ते दीड तास विलंबाने धावत होत्या. लोकल विलंबाने धावत असल्याने ठाणे व कल्याण स्थानकात प्रचंड गर्दी उसळली होती. गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, महाराष्ट्र सुरक्षा दल मधील कर्मचारी डब्याबाहेर तैनात करण्यात आले होते. अपघातामुळे अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्याचाही मोठा फटका प्रवाशांना बसला.

दरम्यान, आज, शनिवारी मुंबई उपनगरीय रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ( छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण / कर्जत/ कसारा) रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button