breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काँग्रेसला मोठा धक्का! उत्तर प्रदेशमध्ये जितिन प्रसाद भाजपमध्ये दाखल

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे हुकमी एक्का जितीन प्रसाद यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर हे पक्षांतर झाल्याने काँग्रेसला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, २०१९मध्ये पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये अमूलाग्र बदलाची मागणी करणाऱ्या जी-२३ गटापैकी जितिन प्रसाद एक आहेत.

भाजपाचे उत्तराखंडमधील खासदार अनिल बलूनी यांनी आज सकाळीच जितिन प्रसाद भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यानुसार, जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेससाठी आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांचा पेपर कठीण झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. जितिन प्रसाद हे उत्तर प्रदेशमधील एक प्रभावी नेते आहेत. विशेषत: काँग्रेससाठी ते उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण चेहरा असल्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं व्होटबँकेचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.

“काँग्रेसमध्ये मला हे जाणवलं की आपण राजकारणात आहोत. जर तुम्ही तुमच्या लोकांच्या हितांचं रक्षण करू शकत नाहीत, त्यांची मदत करू शकत नाही, तर तुमचा राजकारणात राहून काय फायदा? मी काँग्रेसमध्ये हे करू शकत नव्हतो. गेल्या ३ दशकांपासून मी काँग्रेससोबत कार्यरत होतो. पण आज विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय. गेल्या ८ ते १० वर्षांमध्ये मला हे जाणवलं आहे की जर कुठला पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेल, तर तो भाजपा आहे. बाकी पक्षतर व्यक्तीकेंद्री आणि प्रादेशिक झाले आहेत. सध्या आपण ज्या परिस्थितीत आव्हानांचा सामना करत आहोत, तर त्यासाठी आज देशासाठी जर कुणी ठामपणे उभे आहेत, तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी”, अशी सूचक प्रतिक्रिया जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना दिली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनी थेट काँग्रेस नेतृत्व आणि काँग्रेसमधील कार्यपद्धतीवरच निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.

कोण आहेत जितिन प्रसाद?

जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदापासून ते पक्षीय कार्यप्रणालीपर्यंत बदल करण्यात यावेत अशी मागणी पक्षातील एका गटाने केली होती. जी-२३ असं या गटाला म्हटलं गेलं. या गटाने आपल्या शिफारशीवजा मागण्यांचं पत्रच सोनिया गांधी यांना सादर केलं होतं. या गटामध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button