breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

BHOSARI : संभाव्य महायुतीच्या संभ्रमाने दोन्ही “दादा” मौनावस्थेत

  • भाजप-शिवसेना गठबंधन होण्याची प्रतिक्षा
  • खासदार आढळराव, आमदार लांडगे यांची वाढली चिंता

अमोल शित्रे

पिंपरी – आगामी लोकसभेच्या निवडणुका चार-सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याचा सत्ताधा-यांनी चंग बांधला आहे. त्यासाठी महायुतीचे गठबंधन होणार असल्याचे संकेत दिल्लीतील हालचालींवरून मिळत आहेत. या संभाव्य महायुतीच्या जोखडात अडकल्याने शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी कमालीचे मौन धारण केले आहे. दोघांच्या या निशब्द भूमिकेमुळे कार्यकर्त्यांची गेल्या कित्येक वर्षाची राजकीय तपश्चर्या वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. नेत्याची भूमिकाच जर निश्चित नसेल तर, आपल्या तपश्चर्येला काय अर्थ प्राप्त होणार, असा सवाल त्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही दादांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. येवढ्यात दोन्ही नोत्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट न केल्यास दोघांना हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. तर, भाजप आणि शिवसेना युती आणि एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत दोन्ही नेते आपल्या भूमिकेपासून अलिप्तच राहणार, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशभरात वाहणा-या मोदी लाटेला आव्हान देऊन मागील विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी स्वबळावर खाते खोलले. लागलीच त्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघावर शिरस्ता कायम ठेवण्यासाठी येथील सलग तीन टर्म गाजवणारे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना चुचकारण्याचा प्रयत्नही केला. शिरूर लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील सहा आमदारांच्या कार्यक्षेत्राचा सामावेश आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, हडपसर आणि भोसरी या विधानसभा मतदार संघाचा मिळून शिरूर लोकसभा मतदार संघ आहे. त्याचे खासदार आढळराव पाटील आहेत. सहा विधानसभा मतदार संघापैकी भोसरी या एका विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी चुचकारल्याने त्यांना प्रत्युत्तर देणे आढळराव पाटील यांच्यासाठी गौन मुद्दा होता. त्यामुळे आपली प्रतिष्ठा कमी करून घेण्याच्या फंद्यात पडण्यापेक्षा महेश दादांच्या आरोपाकडे आढळरावांनी दुर्लक्ष करणेच हिताचे मानले.

पुणे-मुंबई महामार्ग विस्तारीकरण, पुणे नाशिक मार्गावर भोसरीतील अतिक्रमण, गुंडगिरी तसेच पिंपरी पालिका कारभारावरून आरोपांच्या फैरी सातत्याने झडू लागल्याने आढरावांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी तात्काळ महेश दादांना शांत करण्यासाठी आरोपाला प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. आढळरावांचे प्रत्युत्तर येऊ लागल्याने महेश दादांनी शिरूर लोकसभा मतदार संघावर दावेदारी करत असल्याचे स्पष्ट करून दाखविले. आढळरावांना टक्कर देऊ लागल्याने महेश दादांची भोसरीपासून शिरूरपर्यंत चांगलीच क्रेझ वाढली. आगामी खासदार महेश दादाच अशा आशयाचे फोटो सोशल माध्यमातून व्हायरल होऊ लागले. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी बुध्दीचातुर्य पनाला लावून तयारीही चालू केली. दादांना खासदार केल्याशिवाय शांत बसणे नाही, अशी भूमिका भोसरीतील कार्यकर्त्यांनी घेतली. त्यावर कट्टर विरोधक तयार होऊ लागल्याची भिती मनात दाटून आल्याने आढळरावांनी पालिकेच्या कारभारावरून भाजवर टिकास्त्र सोडत महेश लांडगे यांना टार्गेट केले.

पाणी पुरवठा, पुणे-नाशिक महामार्ग, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, कचरा व्यवस्थापन निविदा अफरातफर असे मुद्ये उचलून धरले. भोसरी आणि पालिकेत पत्रकार परिषद घेऊन सडेतोड शब्दांत आरोप केले. त्यांना प्रत्युत्तर देण्यात महेश दादाही मागे पडले नाहीत. शिरूर मतदार संघातील बैलगाडा मोर्चा तसेच कामगारांच्या आंदोलनाचे नेतृत्व करून महेश दादांनी आढळरावांना टेंन्शन देणे कायम सुरू ठेवले होते. शेवटी आढळरावांनीच माघार घेतल्याने दोघांमधील धुमसणारी आग अखेर शांत झाली. त्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या निर्णयावर केंद्रातील भाजपचे नेतृत्व स्थिर होऊ लागल्याने दोघांनीही आरोप-प्रत्यारोप करण्याच्या फंद्यात न पडता शांत राहण्याचा मार्ग स्वीकारला आहे. आगामी लोकसभा निवडणुका चार सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना दोघांनी कमालीचे मौन धारण केल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.

दोन्ही नेत्यांच्या शांत राहण्याची कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज

भोसरीत 19 सप्टेंबर रोजी सांस्कृतीक महोत्सवाला सुरूवात झाली. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार आढळराव पाटील आणि आमदार लांडगे दोघांनाही निमंत्रीत केले होते. कार्यक्रमात दोघेही अवरजून उपस्थित राहिले. व्यासपीठावरील त्यांची उपस्थिती पाहून कार्यकर्ते मात्र संभ्रमात अडकले होते. एरव्ही दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. मात्र, कार्यक्रमात दोघेजण एकत्र येऊन मौन बाळगल्याने त्यांच्या शांत बसण्याची कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळाली. दोन्ही नेत्यांच्या शांत बसण्याचे नेमके कारण तरी काय, असा प्रश्न अनेकांना भेडसावत होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button