breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

बावधनमधील भैरवनाथाच्या बगाड यात्रेला उत्साहात सुरुवात; हजारो भाविकांनी केली गर्दी

सातारा |

साताऱ्यातील बावधन येथील भैरवनाथाच्या बगाड यात्रेस आज(मंगळवार)मोठ्या उत्साहात सुरूवात झाली असून, यात्रेसाठी हजारो भाविक आणि यात्रेकरूंनी बावधन (ता.वाई) येथे उपस्थिती लावली आहे. सकाळी दहाच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. मागील दोन वर्षांपासून बगाड यात्रेवर काही बंधने होती. २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच बगाड यात्रा झालेली होती, तर मागील वर्षीच्या यात्रेला बंदी घातलेली असतानाही गावकऱ्यांनी गनिमी काव्याने बगाड यात्रा साजरी करत बगाड मिरवणूक काढली होती . यावर्षी खुल्या वातावरणात बगाड यात्रा भरत असल्यामुळे गावकर्‍यांमध्ये मोठा उत्साह आहे. बगाड मिरवणूक पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने यात्रेकरू जमा झाले आहेत . सर्व शिवार आणि रस्ते बगाड ओढणारे बैल आणि यात्रेकरू ग्रामस्थांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.

होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधन (ता वाई) येथील भैरवनाथ मंदिरात यावर्षीचा बगाड्या निवडण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. या वर्षीचा बगाडाचा मान बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे. मागील पाच दिवसांपासून ते गावाततील सर्व मंदिरात पूजा करून मंदिरातच मुक्कामाला असतात. काल (सोमवार) रात्री बावधन येथे शेकडो ढोल ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत मोठी शाही छबिना मिरवणूक निघाली होती, त्यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ यात्रेकरू सहभागी झाले होते. त्यानंतर आज सकाळी बगाड्याला आणि बगाडाचा रथ कृष्णा नदीच्या तीरावर सोनेश्वर येथे आणण्यात आला. तिथे ग्रामदेवतेची पूजा झाल्यानंतर सकाळी दहा वाजेच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढविण्यात आले आणि धष्टपुष्ट बैलांच्या मदतीने दगडी चाकांचे बघाड ओढून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवारनिहाय व भावकी निहाय ठिकठिकाणी १२ ते १६ बैल जुंपून अडीच तीन टन वजनाचा बगाडाचा रथ शेत शिवारातून ओढून बावधन गावात भैरवनाथ मंदिराकडे आणला जातो.

सर्व बलुतेदारांनाही यात सहभागी करून घेतले जाते. यावर्षी करोना निर्बंध उठल्यानंतर यात्रा होत असल्याने यात्रेसाठी हजारो भाविकांनी व यात्रेकरूंनी मोठी गर्दी केली आहे.कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, वाईच्या पोलीस उपाधीक्षक डॉ शितल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी नेमण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक याठिकाणी दाखल आहे.वाई सातारा रस्त्यावर विविध खाद्य पदार्थ,खेळण्यांची दुकाने लागली आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button