breaking-newsTOP NewsUncategorizedपिंपरी / चिंचवडमनोरंजन

सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार विजेती आकांक्षा पिंगळे हिचा सत्कार

पिंपरी : या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये ‘सुमी’ हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट (मराठी) ठरला. या चित्रपटातील ‘सुमी’ ची मुख्य भूमिका पिंपरी चिंचवड शहराची कन्या आकांक्षा लक्ष्मण पिंगळे हिने साकारली होती. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार हा पुरस्कार घोषित झाला. ही बातमी आपल्या शहराच्या नावलौकिकात भर घालणारी तर आहेच शिवाय या शहराचा सांस्कृतिक वारसा अधिक समृध्द करणारी ही घटना आहे. ‘शहरवासियांना तुझा सार्थ अभिमान आहे. असेच यश संपादन करुन आई-वडील आणि आपल्या शहराचे नाव रोशन कर’ अशा शब्दांत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी बालकलाकार आकांक्षाचे कौतुक केले.

आकांक्षाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार हा पुरस्कार पटकावून रजतकमळ मिळवले, त्याबद्दल तिचा आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते आज अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.  त्यावेळी आयुक्त पाटील बोलत होते.  महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या सत्कार प्रसंगी माजी महापौर योगेश बहल, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उप आयुक्त रविकिरण घोडके, आकांक्षाचे आई वडील सुजाता व लक्ष्मण पिंगळे यांच्यासह तिचे नातेवाईक उपस्थित होते.

यावेळी आयुक्त पाटील यांनी आकांक्षासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यापुढे आयुष्यात काय काय करायची इच्छा आहे असे देखील विचारले. सांस्कृतिक क्षेत्रात करीयर घडवत असताना अनेक चांगले वाईट प्रसंग आयुष्यात येत असतात, अशा वेळी आपले प्रयत्न सुरु ठेवले पाहिजे असा सल्ला आयुक्त पाटील यांनी आकांक्षाला दिला.  खडतर मेहनत केली की यश आणि आशिर्वाद आपोआप मिळत असतात. शहरवासियांचे आशिर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत. महापालिका देखील सदैव तुझ्या पाठीशी राहील. पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यासाठी तुझे दैदिप्यमान यश नक्कीच महत्वाचे ठरणार आहे. या तुझ्या राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीमुळे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवा आयाम मिळाला आहे.  अशीच उत्तुंग भरारी घेऊन आपल्या शहराचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करुन आकांक्षाला आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी पुढील उज्ज्वल कारकिर्दीस मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. आकांक्षाच्या यशातून नवोदितांना प्रेरणा मिळेल अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संत तुकाराम नगर पिंपरी येथील रहिवासी असणारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकाविणारी आकांक्षा पिंगळे म्हणाली, मला पुरस्कार घोषित झाल्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  पिंपरी चिंचवड महापालिकेने माझा सन्मान केल्यामुळे मी भारावून गेले आहे. शहराचे प्रेम आणि आशिर्वाद मला असेच कायम मिळत रहावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button