breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही!; रावसाहेब दानवेंची टोलेबाजी

जालना |

मंत्री झालो परंतु कुणी मला नामदार म्हणायला तयार नाही. कारण तसे वागणे जमतच नाही, असे सांगत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या खास शैलीत आणि भाषेत विविध किस्से आणि अनुभव मांडून येथे चौफेर टोलेबाजी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे आणि उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय, तसेच व्यापारी-उद्योजक, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, व्यक्तींच्या दिवाळी स्नेहमीलन-कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी दानवे म्हणाले, काही वक्त्यांनी मी साधा-भोळा असल्याचे म्हटले. यामध्ये किती खरे-खोटे हे तुम्हालाच माहीत नाही. जालना शहरातील एका बँकेत गेलो तर तेथेही माझा उल्लेख एवढा साधा-भोळा मंत्री पाहिला नाही, अशा शब्दांत करण्यात आला. मी माणसांच्या टकरा लावणारा माणूस पण लोक मला रेड्यांच्या टकरा लावण्याचे आमंत्रण देतात. यापेक्षा सोपा मंत्री कुठे सापडणार नाही.

मी जळगावहून येत असताना जालना शहरातून एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने विचारले, ‘कुठे आहात तुम्ही’, मी सांगितले की, ‘अजिंठा लेण्यांपर्यंत आलो आहे.’ समोरची व्यक्ती सांगत होती की, त्याचा सासरा रेल्वेने जालना येथे येत असून संबंधित रेल्वेगाडी तीन क्रमांकाच्या फलाटाऐवजी एक क्रमांकाच्या फलाटावर आणायला सांगा. आता मी काय रेल्वे चालकाला आवाज देऊन सांगू का… त्याचा मोबाइल फोन नंबर माझ्याजवळ असेल… परंतु दुसऱ्या दिवशी ही व्यक्ती भोकरदनला मला भेटायला आली आणि सांगू लागली की, साहेब, तुमच्यामुळे गाडी एक नंबरच्या फलाटावर आली आणि सासऱ्यासमोर माझी इज्जत वाचली. मग मीही म्हणालो, ‘काय सांगू गाडी चालवणारा ऐकतच नव्हता. मला काय त्रास झाला ते मलाच माहीत. पुन्हा अशी कामे नका सांगत जाऊ.’

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा संदर्भ देऊन दानवे म्हणाले, सत्तारसेठ बदनापूरच्या फाट्यावरून चालले असताना रस्त्यातील रेल्वेगेट लागले. त्यांचा फोन आला. आधा घंटा हुआ, अब गेट खोलने को लगाना. भोकरदनचा एक काँग्रेस कार्यकर्ता आणि दहा जण द्वितीय श्रेणीची तिकिटे काढून रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात बसले. तिकीट तपासणीस आल्यावर त्यांनी त्याला सांगितले की, आम्ही दानवेंच्या गावचे आहोत. आणि त्याच्या हातात मला जोडून दिलेला मोबाइल दिला. मग मी तिकीट तपासणिसास सांगितले की, द्वितीय श्रेणी आणि वातानुकूलित डब्याच्या तिकिटातील फरकाची रक्कम त्यांच्याकडून घ्या आणि प्रवास करू द्या. दरम्यान, या वेळी माजी आमदार अर्रंवदराव चव्हाण आणि विलासराव खरात, डॉ. संजय राख, भाजपचे जालना शहराध्यक्ष राजेश राऊत, उद्योजक सुनील रायठठ्ठा, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांच्यासह इतरांची भाषणे झाली.

  • ड्रायपोर्ट येत्या वर्षभरात

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या वतीने जालना शहराजवळ उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टचे उद्घाटन येत्या वर्षभरात होईल, अशी अपेक्षा रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. या संदर्भात आपले संबंधित मंत्र्यांशी बोलणे झालेले आहे. ड्रायपोर्ट हाताळण्यासाठी चार-पाच कोटी रुपये गुंतवणूक करणाऱ्या एजन्सीची आवश्यकता आहे. परंतु आता हा खर्च जेएनपीटीच करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button