breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“थोडी तरी लाज बाळगा, ज्या कुटुंबामुळे…”, नारायण राणेंना दीपक केसरकरांनी सुनावलं!

मुंबई |

राज्यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी या वादात उडी घेत संजय राऊतांवर निशाणा साधला. तसेच, नारायण राणेंनी किरीट सोमय्यांच्या आरोपांना पाठिंबा देत त्यांचं समर्थन देखील केलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नारायण राणेंना परखड शब्दांत सुनावण्यात आलं असून “संजय राऊत आणि किरीट सोमय्यांच्या वादात तुम्ही कशाला पडता, तुम्ही राज्यसभेत बोला”, असा खोचक सल्ला नारायण राणेंना देण्यात आला आहे.

  • “ठाकरे कुटुंबाबद्दल बोलताना राणेंची जीभ…”

“ज्या कुटुंबामुळे नारायण राणे घडले, राजकीय जीवनात येऊ शकले, मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकले, त्या कुटुंबाबद्दल बोलताना नारायण राणेंची जीभ थोडीतरी चाचरली पाहिजे. पण तेवढीही माणुसकी त्यांनी दाखवलेली नाही. तुम्ही अशा कुटुंबाबद्दल बोलताय, ज्या कुटुंबानं महाराष्ट्रासाठी आपल्या आयुष्याची होळी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रबोधनकार ठाकरेंची महत्त्वाची भूमिका होती. मराठी माणसाच्या लढ्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची महत्त्वाची भूमिका होती. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या एकमेव नेत्याचं नाव उद्धव ठाकरेंचं आहे. बाळासाहेब असताना जेवढे आमदार शिवसेनेला मिळाले होते, त्यापेक्षा जास्त आमदार उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या हिंमतीवर मिळवून दाखवले आहेत”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. “संजय राऊत तुमच्याबद्दल बोलले होते का? मग तुम्ही का बोलता? लोकसभेत तुम्हाला उत्तर देता येत नाहीत. मग इथे येऊन का बोलता? सोमय्या कोणाबद्दल बोलले, राऊत कोणाबद्दल बोलले त्यात तुम्ही का उडी घेता?”, असं देखील केसरकर म्हणाले आहेत.

  • नारायण राणेंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, यावेळी बोलताना दीपक केसरकरांनी उलट नारायण राणेंच्याच कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “तुम्ही संसदेत कोकणाचं प्रतिनिधित्व करता. पण तिथे तुम्ही साधी उत्तरं देखील देऊ शकला नाहीत. तुम्ही राज्यसभेचे खासदार, तुम्ही लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत. जी कोकणाची संस्कृती आहे, त्याचा तरी विचार करा. थोडी तरी लाज बाळगा. कुठल्या कुटुंबाबद्दल काय बोलता याला थोडी तरी मर्यादा असायला हवी”, असं केसरकर म्हणाले. “ज्या किरीट सोमय्यांनी तुमच्यावर आरोप केले होते, ते आरोपही खरेच मानायला हवेत. किरीट सोमय्या खरच बोलत असतील, तर तुमच्याबद्दलही खरंच बोलत असतील. तुम्ही त्यावेळेस सोमय्यांच्या आरोपांना सामोरे न जाता लोटांगण घालून तुम्ही भाजप मधे गेलात. एकदा तरी स्वत:ला बदला. वाल्याचा वाल्मिकी होतो असं गडकरी साहेबांनी एकदा म्हटलं होतं. कुणासाठी ते माहीत नाही. पण वाल्मिकी होऊन दाखवायला हवं ना. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. मानसिकता बदलावी लागते. ती कधीतरी बदलावी एवढीच अपेक्षा आहे”, असा टोला देखील दीपक केसरकरांनी लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button